वादळी पावसाने दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट

वादळी पावसाने दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट

खेरवाडीतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

दिक्षी:  सोमनाथ चौधरी

निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील द्राक्ष उत्पादक गणेश अशोक गायखे यांचा काढणीला आलेली दोन एकर द्राक्षबाग वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याची घटना रविवारी (दि. ९) सायंकाळी घडली. या अस्मानी संकटामुळे गायखे कुटुंबाचे तोंडचे पाणी पळाले आहे…

खेरवाडी पंचक्रोशीत उत्कृष्ट गुणवत्तेचे द्राक्ष उत्पादक म्हणून नावाजलेले गणेश गायखे यांची गट नंबर ८६१ मध्ये ‘सुधाकर’ या सुधारित द्राक्ष वाणाची परिपक्व झालेली व १७ ते १८ प्लस साईज असलेली गुणवत्तायुक्त दोन एकर द्राक्षबाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने भुईसपाट झाली.

या द्राक्षबागेचा दोन दिवसात व्यवहार होणार होता. उत्कृष्ट क्वाॅलिटी असल्याने सध्याच्या बाजारभावाप्रमाणे जास्तीत जास्त ३० रुपये किलो दराने व्यापाऱ्याने मागणी केली होती. दहा ते बारा लाख रुपयाचे उत्पन्न मिळणार अशी आशा असतानाच रविवारी सायंकाळी सहाच्यादरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.
काही प्रमाणात गाराही झाल्या. गारपिटीने आता द्राक्षमणी क्रॅक जातील, हे गायखे कुटुंबाने गृहीतच धरले होते. मात्र, प्रचंड वाऱ्याच्या एका झोकाने डोळ्यासमोर द्राक्षबाग भुईसपाट होऊन क्षणात होत्याचे नव्हते झाले. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे देखभाल केलेली द्राक्षबाग जमिनदोस्त झाल्याने पूर्णपणे आर्थिक गणित कोलमडले असून गायखे कुटुंबाला अश्रू अनावर झाले
घटनेची माहिती समजतात तलाठी शिल्पा भोई व कृषी सहाय्यक अर्चना सातपुते यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीचा पंचनामा केला. तसेच, गावात अनेक द्राक्ष उत्पादकांचे काढणीस आलेल्या अनेक बागांचे नुकसान झाले आहे.
द्राक्षमणी पावसानंतर दोन ते तीन दिवसांनी क्रॅक जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी गायखे कुटुंबासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.

द्राक्ष बागाच्या छाटणी पासून तर काढणी पर्यंतचा वाढलेला खर्च तसेच निशार्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे
यामुळे द्राक्ष शेती करणे फार जिकरीचे झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास कालच्या वादळाने हिरावून नीला .. शासनाने आम्हा द्राक्ष उत्पादकांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.

गणेश अशोक गायखे खेरवाडी, द्राक्ष उत्पादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *