दीपोत्सवानिमित्त पूरग्रस्तांना किराणाधान्य किट वाटप

येवल्याच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे दातृत्व

येवला : प्रतिनिधी
दीपावली तोंडावर आली असताना, दुसरीकडे महाराष्ट्र ओला दुष्काळाचा सामना करीत आहे. अनेकांचे शेतात नुकसान झाले, तर काहींच्या घरांची पडझड झाली. पावसामुळे अनेक जण त्रस्त झाले. हे दुःख ओळखून येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाने पूर्वपरंपरेप्रमाणे याही वेळेस मदतनिधी उभा करीत दातृत्वाची मिसाल कायम ठेवली.विद्यालयातील दोनशे शिक्षकांनी स्वतः या मदतीत सहकार्य केले.
श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या संचालक मंडळाने एक्कावन्न हजारांची भर टाकून एक लाख पंचवीस हजारांचा किराणामाल अर्थात आनंदाचा धान्य किराणाचे किट करून काल त्याचे वितरण केले.
विद्यालयात काल संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कै. अ‍ॅड. जे. जी. खानापुरे व तत्कालीन अध्यक्ष कै. शरदभाऊ नागडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीपर कार्यक्रमात हे किट प्रदान करण्यात आले. प्राचार्य अरुण विभूते यांनी प्रास्ताविक केले. शहरातील श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव सुधांशू खानापुरे, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक संजय नागडेकर, प्रवीण नागडेकर, सभासद दत्तात्रय नागडेकर यांच्या हस्ते पूरग्रस्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक किराणा माल शेंगदाणे, रवा, साखर, तेल, तांदूळ, डाळ आदी वस्तूंसह किट देण्यात आले. यात साधारण एक हजार रुपयांचा किराणा आहे. सुरुवातीला 225 किट संस्थेने शिक्षकांंमार्फत घरपोेच देऊन पूरग्रस्तांची दीपावली गोड करण्यात हातभार लावला.
दरम्यान, संस्थेतील पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीपर कार्यक्रमात संचालक प्रवीण नागडेकर यांनी संस्थेला संगीत साहित्य तबला दान म्हणून दिला. शिक्षिका सुषमा नागडेकर, प्रवीण नागडेकर, कमलेश खेरूड यांचा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पॅड व वही देऊन सन्मानित केले. उत्सवप्रमुख व संस्कृत विभागप्रमुख डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा. मनोहर पाचोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास बोकटे शाखेचे ज्ञानेश्वर भागवत, इंग्रजी माध्यम प्रमुख युवराज काशिद, हुडको प्राथमिकचे घोडके, संजय जाधव, उपप्राचार्य अंबादास ढोले, राजेंद्र सोनवणे, पर्यवेक्षक आर.टी. खैरनार, डी. डी. साताळकर आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *