मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सुविधांच्या कामांना प्रारंभ
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा 2026-27च्या नियोजनात पायाभूत सुविधांच्या कामांचे भूमिपूजन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केले. जुना आखाड्याच्या पिंपळद येथील महामंडलेश्वरनगर असलेल्या जमिनीवर साधू-महंत यांसह मन्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी सर्व 10 आखाड्यांच्या अंतर्गत सुविधांच्या कामांना अधिकृत प्रारंभ झाला असल्याची घोषणा कुंभमेळामंत्री महाजन यांनी केली. सर्व आखाड्यांना 75 लाखांचे प्राथमिक विकासकामे देण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने ध्वजांतर्गत काँक्रिटीकरण आणि टॉयलेट ब्लॉक यांचा समावेश आहे. त्र्यंबक नगरपरिषदेच्या अंतर्गत ही कामे होणार आहेत. त्यांचे भूमिपूजन झाले असून, यापुढे कामांना प्रारंभ झाला आहे. ही सर्व पहिल्या टप्प्यातील कामे आहेत. यापुढे आणखी कामे तातडीने मंजूर करून ती सुरू करण्यात येतील. यावेळी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी साधू-महंतांच्या मागणीप्रमाणे सर्व कामे होतील, असे सांगितले. भूमिपूजनप्रसंगी कुंभमेळामंत्री महाजन यांच्यासह नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी महाराज, महामंत्री महंत हरीगिरी महाराज, कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत रघुमुनी महाराज यांसह कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.पौरोहित्य पुरोहित संघ अध्यक्ष मनोज थेटे, त्रिविकम शास्त्री जोशी यांच्यासह त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मवृंद यांनी केले. साधू-महंतांसह तहसीलदार गणेश जाधव पाटील, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व 10 आखाड्यांच्या नावे संकल्प करण्यात आला. त्यानंतर उर्वरित आखाड्यात भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, प्रत्येक आखाड्याला 12 खोल्या असलेली निवासी इमारत बांधून देण्याचे ठरवण्यात आल्याचे व ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करणार असल्याचे समजते.
Groundbreaking ceremony for the works in the Kumbh Mela arena