जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील भूजल पातळी खालावली
नाशिक ः देवयानी सोनार
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होऊनही भूजल पातळीत फारशी वाढ होऊ शकलेली नाही. जानेवारी महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात सिन्नर, निफाड, येवला या तालुक्यांत भूजल पातळी खालावली असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याचा अति प्रमाणात उपसा होत असल्याने भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याची पातळी खालावली असल्याचे समोर आले आहे. भूजल पातळी निरीक्षण विहिरी ठरविलेल्या आहेत. या निरीक्षण विहिरींच्याद्वारे भूजल
सर्वेक्षणाच्या पाणलोट क्षेत्रनिहाय 185 निरीक्षण विहिरी आहेत. वर्षातून चार वेळा ऑक्टोबर, जानेवारी मार्च आणि मे या महिन्यात भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. इगतपुरीमध्ये सप्टेंबर2024 मध्ये पाणीपातळी 0.13 मीटरने कमी झाल्याचे दिसून आले आहे. इतर तालुक्यांमध्ये पाच वर्षांच्या तुलनेत सरासरी वाढ दिसून येत आहे.
भूजलपातळी कमी होण्याची कारणे
नैसर्गिक गोष्टींवर, हवामान, पाऊस आदींवर भूजल पातळी अवलंबून असते. वातावरणातील बदल. कधी ढगफुटीसारखा पाऊस तर दुसरीकडे कमी पाऊस. पाऊस जास्त, पाऊस कमी वेळात झाल्यास पाणी मुरण्याऐवजी वाहून जाण्याचे प्रमाण जास्त होते. शेतीसाठी, पिण्यासाठी, वापरासाठी पाण्याचा उपसा केला जातो. भौगोलिक परिस्थिती, जमिनीचा उतार, मातीची जाडी, दगडांचा प्रकार या सर्व गोष्टींवर एकत्रितरीत्या पाणी पातळी कमी किंवा जास्त होते.सप्टेंबरच्या अहवालानुसार देवळा, निफाड, सिन्नर या तालुक्यांमध्ये पाणीपातळी वाढली होती. परंतु जानेवारीत पुन्हा कमी झाली आहे. शेतीसाठी, सिंचनासाठी बोअरवेलला बंदी घालण्यात आली आहे.
उपाययोजना
जलसंवर्धनाची कामे करणे, पाण्याचा उपसा नियंत्रित करणे, सूक्ष्म सिंचनाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, तुषार, ठिबक सिंचन, पाणी बचतीच्या उपायांचा वापर करणे, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, नियोजन करणे.
जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा, ऊस, गहू आणि द्राक्षे ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पाण्याची पातळी खालावण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वांत जास्त प्रमाणात पाण्याचा झालेला उपसा आणि पावसाचे पाणी अडवले न गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी अडवण्याच्या योजना प्रभावीपणे अमलात आणण्याची गरज आहे.
धरणांच्या गावांत पाणीटंचाई
इगतपुरी, त्र्यंबकसारख्या भागात कठीण पाषाण आहे. या ठिकाणी पाणी मुरत नाही. पाऊस असताना भरपूर पाणी असते. विहीर किंवा बोअरचे पाणी उपसले की, जमिनीतून प्रवाहित होऊन येणारे पाणी राहत नाही.
विहिर बोअरवेल खोदण्यास बंदी नाही. महाराष्ट्र भूजल अधिनियम कायदा आहे. त्याअंतर्गत खासगी लोकांना बंदी नाही. शासनाच्या योजनांमध्ये बोअर किंवा विहिर ज्या भागात भूजल पातळी खालवलेली आहे. अशा भागांमध्ये अधिकृतरित्या त्यांना शासकिय योजनांमध्ये परवानगी देत नाही.
– के. एस. कांबळे
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल
सर्वेक्षण यंत्रणा नाशिक