एचएएलमध्ये आता दरवर्षी 24 तेजस विमानांचे उत्पादन

तिसरी उत्पादन लाइन; एक हजार जणांना रोजगाराची संधी

नाशिक ः प्रतिनिधी
भारतीय हवाई दलाला स्वदेशी युद्धविमान तेजस (एलसीए एमके-ए) जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) नाशिक येथे एलसीए एमके-1ए ची तिसरी उत्पादन लाइन उभारून देशाच्या विमान उत्पादन क्षमतेत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. यामुळे आता एचएएलमध्ये वर्षाला 24 तेजस विमानांचे उत्पादन होणार आहे.
सन 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली ही लाइन नाशिक विभागातील मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर करून उभारली गेली आहे. सुमारे पाचशे कोटींच्या अंतर्गत गुंतवणुकीतून उभारलेल्या या अत्याधुनिक लाइनमध्ये शीटमेटल पार्ट, सीएनसी पार्ट, पाइपलाइन, वेल्डेड असेंब्ली, कॅनोपी, विंडशील्ड, तसेच लूम्स आणि रिले बॉक्स निर्मितीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ही लाइन पूर्णपणे कार्यान्वित असून, एलसीए एमके-1ए च्या सेंटर, फ्रंट व रिअर फ्यूजलेज, विंग्स आणि एअर इनटेकसह तीसहून अधिक प्रमुख मॉड्यूल्सच्या असेंब्ली जिग्सवर काम सुरू आहे. सध्या एकूण 13 लाख चौरसफूट क्षेत्रावर उत्पादनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिले विमान पूर्णपणे असेंबल होऊन सर्व पूर्वोड्डाण चाचण्या पार केल्या आहेत.
समांतर तिसर्‍या लाइनमुळे आता एचएएलला दरवर्षी 24 तेजस विमानांचे उत्पादन करता येणार आहे. (प्रत्येक लाइनची क्षमता- आठ विमाने). यामुळे भारतीय हवाई दलाला विमानांचे जलद वितरण शक्य होईल. या नव्या उपक्रमामुळे सुमारे एक हजार स्थानिक नोकर्‍या निर्माण झाल्या असून, महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील 40 हून अधिक उद्योग भागीदार यात सहभागी झाले आहेत. या भागीदारीमुळे सुमारे 40 टक्के काम खासगी क्षेत्राकडून पार पाडले जात आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात सार्वजनिक-खाजगी भागीदारी मजबूत होत आहे.
तिसर्‍या उत्पादन लाइनमुळे एचएएलला मित्रराष्ट्रांना तेजस विमानांची निर्यात वाढवण्याचा मार्ग खुला झाला आहे. पुढील दोन वर्षांत वार्षिक उत्पादन क्षमता दहा विमानांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.

विमान उत्पादनाचा पाया

नाशिकमधील असेंब्ली कॉम्प्लेक्स हे एचएएलचे प्रमुख केंद्र असून, याठिकाणी आतापर्यंत मिग-21, मिग-27, बायसन ते एसयू-30 एमकेआय अशी एक हजारांहून अधिक विमाने तयार झाली आहेत.सध्या येथे एसयू 30 एमकेआय, एलसीए आणि एचटीटी-40 या तीन उत्पादन लाइन कार्यरत आहेत. संपूर्ण असेंब्ली प्रक्रिया डिजिटल पेपरलेस प्रणालीवर आधारित असून, इंडस्ट्री 4.0 आणि क्वालिटी 4.0 मानकांनुसार सर्व तपासण्या व ऑपरेशन्स पार पडतात. नाशिक असेंब्ली कॉम्प्लेक्समध्ये तयार होणारे हिंदुस्थान टर्बो ट्रेनर-40 हे भारतीय हवाई दलाच्या प्राथमिक प्रशिक्षणासाठी डिझाइन केलेले स्वदेशी बेसिक ट्रेनर एअरक्राफ्ट आहे. हनीवेल ढझए331-12इ टर्बोप्रॉप इंजिनद्वारे संचालित हे विमान पूर्णपणे एरोबॅटिक आहे. आधुनिक काचेच्या कॉकपिटसह शून्य-शून्य इजेक्शन सीटनी सज्ज आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत एचएएलने स्वतःच्या निधीतून तयार केलेल्या या विमानाने ऋअठ-23 आणि अडटठ या दोन्ही मानकांची पूर्तता केली आहे. यामुळे हे विमान लष्करी आणि नागरी दोन्ही वापरासाठी प्रमाणित ठरले आहे. एचटीटी-40 उत्पादनामुळे पंधराशे थेट आणि तीन हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला. शंभरहून अधिक चडचएड यात सहभागी आहेत. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रकल्पामुळे भारताचे संरक्षण उत्पादन स्वावलंबनाच्या नव्या टप्प्यावर पोहोचले आहे. एलसीए एमके-1ए तिसरी लाइन आणि एचटीटी-40 सारखी स्वदेशी उत्पादने केवळ तांत्रिक प्रगतीचे नव्हे, तर आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने संरक्षण उत्पादन क्षमतेचे प्रतीक ठरली आहेत. नाशिक आता भारतीय विमान उत्पादनाच्या नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.

देशाच्या सामर्थ्याला नवे पंख

सुखोई व एचटीटी-40 ने दिली सलामी

नाशिक : प्रतिनिधी
देशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत स्वदेशी तेजस एमके-1ए या अत्याधुनिक लढाऊ विमानाने शुक्रवारी (ता.17) ओझरच्या आकाशात पहिली यशस्वी झेप घेतली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार नाशिककर ठरले. भारतीय हवाई दलातील सुखोई-एसयू-30 एमके आणि एचटीटी-40 या विमानांनी तेजसला पायलटींग करत सलामी दिली. ओझरच्या हवाई क्षेत्रात या तीन विमानांनी सादर केलेल्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
नाशिकमधील एचएएल युनिटमध्ये तयार झालेले तेजस एमके-1ए हे पहिलेच विमान भारतीय हवाई दलाकडे औपचारिकरित्या हस्तांतरित करण्यात आले. सोहळ्याची सुरुवात एचटीटी-40 विमानाच्या झेपेने झाली, त्यानंतर सुखोई आणि तेजसने गगनभरारी घेतली. सुमारे 20 मिनिटांच्या या प्रात्यक्षिकादरम्यान विमानांनी हवेत 180 ते 360 अंशांच्या कोनात कलाटणी घेत हवेत उंच झेप घेतली. उपस्थितांनी भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय श्रीरामच्या जयघोषात तेजसच्या पहिल्या उड्डाणाचा जल्लोष केला. विमान धावपट्टीवर परतल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जलतुषारांची सलामी देत या स्वदेशी गौरवाचे स्वागत केले. देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका निभावणार्‍या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने आतापर्यंत 4 हजार लढाऊ विमानांची निर्मिती केली असून त्यापैकी 1800 विमाने स्वदेशी बनावटीची आहेत. तसेच कंपनीने 6 हजार विमान इंजिनांचे उत्पादन करून 34 हजार कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली आहे.

 

या वैमानिकांनी केले सारथ्य

तेजस – के. के. वेणुगोपाल (मुख्य वैमानिक, एचएएल)
सुखोई-30 – एन. के. रथ (विंग कमांडर)
एचटीटी-40 – संजय वर्मा (विंग कमांडर)

 

तेजस हे लढाऊ श्रेणीतील अत्याधुनिक हलके विमान असून, यातील सर्व प्रणाली डिजीटल आहेत. विमानाचा डिस्प्ले बोर्ड आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असून रडारशी जोडलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा भेद करण्याचे सामर्थ्य या विमानात आहे.
– के. के. वेणुगोपाल, मुख्य वैमानिक, एचएएल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *