परतीच्या पावसाने सोंगणीला आलेल्या पिकांचे नुकसान; निफाड-सिन्नर वाहतूक बंद
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरासह तालुक्यात शनिवारी (दि.27) परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अवघ्या 12 ते 14 तासांत महिनाभराच्या सरासरीच्या निम्मा पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात सरासरी 153.9 मिलिमीटर पाऊस पडतो. तालुक्यातील 12 पैकी जवळपास सहा मंडळांत सरासरीच्या निम्म्याहून अधिक पाऊस पडला. नायगाव मंडळात सर्वाधिक 103.5 मिलिमीटर पाऊस पडला.

गोदावरीला आलेल्या पुरामुळे सिन्नर – निफाड राज्य मार्गावरील नांदूरमध्यमेश्वर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे दोन तालुक्यांना जोडणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, सिन्नर शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेवटच्या टप्प्यात सोंगणीला आलेली मका, सोयाबीन शेतात भिजल्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अनेक ठिकाणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहराच्या नवीन उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी नव्याने लेआउट पडले असून, तेथे घरे, इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे.
मात्र, गटारी आणि रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे सर्व पाणी रस्त्यांवरून धावत असल्यामुळे आणि मोकळ्या जागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पाणी साचलेल्या आणि चिखलाने माखलेल्या रस्त्यावरूनच उपनगरांतील रहिवाशांना मार्गक्रमण करावे लागत असल्याने बांधकाम व्यावसायिकांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
वैष्णवी हॉटेलच्या पाठीमागे नव्याने वसलेल्या प्रकाशनगरात ही समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.

असे झाले नुकसान
परतीच्या पावसाने तालुक्यातील घोटेवाडी येथील लहानू भीमराज कांदळकर यांच्या राहत्या घराची भिंत पडून नुकसान झाले. घोरवड – शिवडे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकर्यांच्या टोमॅटोच्या शेतातील सरींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ठाणगाव परिसरात किरण बोराडे यांच्यासह परिसरातील शेतकर्यांची चारा पिके वादळी वार्याने आडवी झाल्याने नुकसान झाले. शिवडे येथील वाळू गोपाळा मधे या शेतकर्याची गट नंबर 554 मधील विहीर भीज पावसामुळे ढासळल्याने मलबा विहिरीत जाऊन नुकसान झाले. मिरगाव येथे आदिनाथ शेळके या शेतकर्याच्या शेतातील पोल्ट्रीचे पत्रे उडाले. तर शहा परिसरात वादळी वार्याने ऊस शेतात आडवा झाल्यामुळे एका शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंडळनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटर)
सिन्नर – 44.9, पांढुर्ली – 65.8 , डुबेरे – 56.8, देवपूर – 79.8, वावी – 81, शहा – 89, नांदूरशिंगोटे – 81, सोनांबे – 65.8, नायगाव – 103.5, पांगरी बुद्रुक – 79.8, गोंदे – 44.8.