राजदंडाला हात, पटोलेंचे निलंबन

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विधानसभेत गदारोळ

मुंबई :
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्‍यांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून सभागृहात संताप व्यक्त केला. त्यानंतर पटोले हे विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांच्या जागेजवळ गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला. यानंतर नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात
आले.
नाना पटोले म्हणाले की, या सरकारमधले सदस्य बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ज्या पद्धतीने सातत्याने शेतकर्‍यांचा अपमान करत आहेत. हा अपमान आता राज्यातील शेतकरी सहन करणार नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकर्‍यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. ‘मोदी तुमचा बाप असेल, शेतकर्‍यांचा बाप होऊ शकत नाही,’ असे वक्तव्य अजिबात चालणार नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे म्हणत नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, नाना पटोले तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणे, मला बरोबर वाटत नाही, हे चुकीचे आह. मला कारवाई करायला भाग पाडू नका. यानंतर पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या जागेजवळ जात आपला संताप व्यक्त केला. यानंतर नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी रद्द केली. त्यानंतर राहुल नार्वेकर म्हणाले की, नाना पटोले हे सभागृहाचे अध्यक्ष राहीले आहेत. राज दंडाला हात लावल्यानंतर काय कारवाई केली जाते, याची कल्पना तुम्हाला असेल. मला कारवाई करायला भाग पाडू नका, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही, नाना पटोले यांनी माफी मागितली पाहिजे. यानंतर नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्याची घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली. यानंतर नाना पटोले सभागृहाच्या बाहेर निघून गेले. पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन करण्यात आल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *