महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव; पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम
निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्याच्या सरहद्दीवर असणार्या करंजी खुर्द येथे गेल्या 46 वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील प्रतिजेजुरी असलेल्या मर्हळ खुर्द येथील पालखी गोदावरी भेटीसाठी श्रीक्षेत्र करंजी खुर्द येथे यायची; परंतु काही काळापासून खंडित झालेली महाशिवरात्रीची ही ऐतिहासिक यात्रा सुरू व्हावी, यासाठी मर्हळ ग्रामस्थ व करंजी खुर्द ग्रामस्थ एकत्र येत यंदापासून पुन्हा मोठ्या थाटामाटात ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल 46 वर्षांनंतर करंजी खुर्द गावात पुन्हा ‘हर हर महादेव’ गजर घुमणार आहे. यानिमित्त संपूर्ण गाव पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. ग्रामस्थांनी या यात्रेची जय्यत तयारी केली आहे.
होळकर घराण्यातील वंशजांची प्रमुख उपस्थिती करंजी येथे भरणार्या या यात्रा सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर तसेच तुकोजीराव होळकर यांचे वंशज श्रीमंत अभिमन्यू होळकर उपस्थित राहणार असून, याबरोबरच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडचे माजी नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतिन कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, मच्छिंद्र बिडगर, रामदास काळे, समाधान बागल आदींसह परिसरातून पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस भरणार्या या यात्रोत्सवात रविवारी (दि. 15)दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत पालखी मिरवणूक, तर सायंकाळी सात ते नऊ फराळ वाटप व सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री नऊ ते पहाटे पाच जागरण गोंधळ. सोमवारी (दि. 16) सकाळी नऊ ते अकरा डॉ. जलाल महाराज सय्यद यांचे हरीकीर्तन होईल. त्यानंतर दुपारी 12 ते 3 महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. महाप्रसादाचे अन्नदाते शिरवाडे ग्रामपालिकेचे सरपंच डॉ. श्रीकात आवारे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करून यात्रेची सांगता होईल. या उत्सवासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थ, तरुण मित्रमंडळ करंजी खुर्द यांच्यातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. 46 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ही परंपरा पुन्हा सुरू होत असल्याने परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करंजी खुर्द ग्रामस्थांनी केले आहे.
‘Har Har Mahadev’ chants echo in Karanji Khurd after 46 years