मेहनती व्यक्तिमत्त्व गेले : पंतप्रधान मोदी
अजित पवारजी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि असंख्य चाहत्यांप्रति मनःपूर्वक शोकसंवेदना. महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो.माझा दिलदार मित्र गमावला : मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत होते. सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. सुप्रिया सुळे व पार्थ पवारसोबत माझे बोलणे झाले. अशा गोष्टीवर मन विश्वासच ठेवत नाही. हा पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. या दु:खाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जमिनीशी घट्ट नाळ असलेले जनतेचे, माझे मित्र व सहकारी होते. उपमुख्यमंत्री पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार व दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे.मोठा भाऊ हरपला : उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, माझ्या मनात माझा मोठा भाऊ हरपला, अशी भावना आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मनाला चटका आणि वेदना देणारी ही घटना आहे. अजितदादा आपल्याला इतक्या लवकर सोडून जातील असा विचारही कोणी केला नसेल. दादा गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते. अतिशय परखड व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं. चुकीला चूक म्हणणारे ते असले तरी ते मनाने अतिशय निर्मळ होते, याचा अनुभव मी घेतला आहे. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. सकाळी 6 वाजतादेखील ते लोकांना भेटायचे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते. त्यामुळेच मला माझा मोठा भाऊ हरपला, असे वाटत आहे.