हर्षा बडगुजरांची माघार, ढोमसेंचा मार्ग मोकळा

प्रभाग 29 मध्ये हाय व्होल्टेज लढत रंगणार

सिडको : विशेष प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नाशिक महापालिकेच्या सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 25 व 29 मध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपच्या माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, तसेच दीपक बडगुजर या मायलेकांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने या दोन्ही प्रभागांतील भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला.
सिडको विभागात एकूण सहा प्रभाग असून, शुक्रवारी (दि. 2) उमेदवारी माघारीचा अंतिम दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच सिडको विभागीय कार्यालयात इच्छुक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. अंतिम वेळ जवळ येताच राजकीय हालचाली तीव्र झाल्या. या पार्श्वभूमीवर दीपक बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक 25 मधील आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. मात्र, प्रभाग क्रमांक 29 मधून त्यांनी उमेदवारी कायम ठेवत भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक झाली. भाजपाची पक्षशिस्त व नियमांचे पालन करत हर्षा बडगुजर यांनीही प्रभाग क्रमांक 25 मधून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री ढोेमसे यांचा मार्ग सुकर झाला असून, त्या भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
या प्रभागातून माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचा अर्ज कायम आहे. प्रकाश अमृतकर भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत. साधना मटाले या भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक बडगुजर भाजपकडून निवडणूक लढवत असून, माजी नगरसेवक मुकेश शहाणे अपक्ष म्हणून मैदानात आहेत. या प्रभागात डॉ. योगिता हिरे, भूषण राणे, दीपक बडगुजर आणि छाया देवांग हे भाजपकडून उमेदवार आहेत.
प्रभाग क्रमांक 25 मधून सुधाकर भिकाजी बडगुजर, साधना पवन मटाले हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. माजी नगरसेविका भाग्यश्री राकेश ढोमसे व प्रकाश गिरीधर अमृतकर हे दोघे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत.
प्रभाग क्रमांक 29 मधून भाजपचे दीपक सुधाकर बडगुजर, भूषण सुरेश राणे, डॉ. योगिता अपूर्व हिरे आणि माजी नगरसेविका छाया देवांग हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी उमेदवारी माघारीच्या पार्श्वभूमीवर सिडको विभागीय कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने काही उमेदवार सकाळपासून विभागीय कार्यालयात उपस्थित होते. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे काही उमेदवारांनी दुपारी अडीचच्या सुमारास स्वतःहून उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याचे दिसले.

Harsha Badgujar’s retreat, path cleared for Dhomse

 

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *