उत्पादनात लक्षणीय घट, अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान
लासलगाव : वार्ताहर
सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, यावर्षी लागवडीखालील क्षेत्र 3 ते 4 टक्क्यांनी कमी होते. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट अपेक्षित आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन सुमारे 110 लाख टन झाले होते. यावर्षी ते 90 ते 95 लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजारात पुरवठा कमी होणार आहे.
यंदा सोयाबीनची निर्यात कमी असली, तरी गेल्या वर्षी मिलर्सना चांगला नफा मिळाल्याने क्रशिंग (तेलासाठी प्रक्रिया) मोठ्या प्रमाणात झाली होती. दुसरीकडे, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाफेडकडे असलेला 18 ते 20 लाख टन सोयाबीनचा साठा सातत्याने कमी झाला आहे. संपूर्ण देशाचा विचार केल्यास, पुढील वर्षासाठीचा साठा केवळ 3 ते 4 लाख टनांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. या कमी उत्पादनामुळे आणि मर्यादित साठ्यामुळे बाजारात सोयाबीनची मागणी वाढत जाईल आणि त्यामुळे भावावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला चांगला प्रतिसाद मिळत असून, सोयाबीनची आवक वाढल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघेही बाजाराच्या हालचालीकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत. लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 4,500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मात्र, वाढलेला उत्पादन खर्च पाहता, शेतकर्यांना किमान पाच हजार रुपयांच्या सर्वसाधारण दराची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या मिळालेला दर दिलासादायक असला, तरी बहुतांश शेतकर्यांना परवडणारा भाव मिळण्यासाठी सर्वसाधारण दरात आणखी वाढ होणे आवश्यक आहे.
मार्चनंतर मोठी तेजी
बाजार विश्लेषकांच्या मते, जानेवारीनंतर सोयाबीनचे दर एमएसपीपेक्षा वर जाण्याची दाट शक्यता आहे. एकदा आवक कमी झाली आणि माल व्यापारी व साठवणूकदारांच्या हातात गेला की, दरात निश्चितच वाढ होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजी आणि देशांतर्गत कमी उत्पादन यामुळे मार्च ते मे दरम्यान सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होऊन ते 5,800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतात.
शेतकर्यांसाठी सल्ला
सध्याचे सोयाबीनचे बाजारभाव समाधानकारक असले, तरी शेतकर्यांनी आपला 50 टक्के माल सीसीआय किंवा शासकीय खरेदी केंद्रांवर एमएसपी दराने (5,328 रु.) विकून सुरक्षित व्हावे. यामुळे तत्काळ आर्थिक गरज पूर्ण होईल. उरलेला 50 टक्के माल मार्चच्या अखेरपर्यंत किंवा पुढील मोठी तेजी येईपर्यंत थांबवून ठेवावा. या काळात दरात वाढ होऊन चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता असल्याचे या क्षेत्रातील विश्लेषकांचे मत आहे.