लेखमाला सदर भाग 2
अंतरीचा आवाज
“तो जेव्हा ती होते”
तुला खरं सांगते ताई…
माझं बालपण खूप सुखात गेलय…
दिपक म्हणजे घरात सगळ्यात लहान दिसायला गोरापान असा गोंडस मुलगा होता ..
मोठ्या बहीणी मला जीवापाड जपत असायच्या…
वडील घरात पुरुषी हुकूमत गाजवायचे…आईला बहीणीला फारसे महत्त्व देत नसे… त्यांच्या समोर बहीणीनी यावं बोलावं असं कधी चित्र बघायला मिळालेच नाही…मोठा शेतीशिवार ,नोकरचाकर ,गाडी बंगला, बागायतदार संपत्ती असलेले वडील पण श्रीमंतीच्या गर्वाने बाई आणि बाटलीपासून दूर झालेच नाही….
तरीही आई मोठी धीराची आणि खंबीर होती..तिने बहीणींना शिकवले…व स्वतःची आवड छंद जोपासत भरतनाट्यमचे कथ्थकचे क्लास घेत असे…
केरळमध्ये नाटक कंपनीला महत्त्व होते…आई उत्तम कलाकार होती.गृपने ड्रामा,डान्स, नाटक बसवून स्वतःसह सादरीकरणही करत असे.. तिने घर सांभाळून तिची आवड जोपासली ..पैशाची चिंता कधीच नव्हती…समाजाचं काम म्हणून प्रतिष्ठा वाढत होती त्यामुळे वडील आईला बाहेर पडायला विरोध करत नसे…
यात छोटा दिपकचे हाल होवू दिले नाही..आई कामावर गेली कि मोठी बहीण आक्का माझी आई झाली..तिनेच मला सांभाळले..चुलत बहीणीसह मला सतत त्याच्यातच खेळायला धावायला गंप्पात रमायला आवडत होते..
आई दमून घरी आली कि मला कुरवाळत असायची..आक्का चे कौतुक करायची माझी जबाबदारी आक्काने घेतली होती…
आईचे स्वप्न होते कि मुलींपैकी एखादी ने तरी तिच्या या कलेची परंपरा चालवावी भरतनाट्यम शिकावे..पण बहीणींना त्यात आवड नव्हती..
“मात्र पुढे मोठं झाल्यावर ती आवड माझ्यात आली होती.”
चाचांना दोनच मुली होत्या वडील नेहमी त्यांना कमीपणा दाखवत..पण चाचा चाची नाराजी न दाखवता आपलं आपलं काम करत असायचे..ते मला फार जीव लावायचे…
बघता बघता मी मोठा होत होतो…खेळताना विरंगुळा म्हणून बहीणी मला त्यांचे फ्राॅक घालून मेकअप करुन द्यायच्या.. आणि म्हणायच्या..
“अय्या,दिपक किती छान दिसतो रे ,अगदी मुलीसारखाच शोभतो हं. आरशात बघ जरा”….
मग मीही त्यांच्या संगतीत वाढत होतो.. स्वतःला आरशात बघून तसाच लाजून रिप्लाय द्यायचो…. आणि मग बहीणींच्या चेहऱ्यावर हसू फुलायचे…!
कधी बागेत कधी शेतावर बहीणी सोबत गेलं कि आंबट तुरट चिंचा, बोरं, पेरु तोडून खाताना मजा यायची…ते आंबट चवीने होणारे बहीणींचे चेहऱ्यावरचे हावभाव बघून माझ्याही चेहऱ्यावर हुबेहुब यायचे..मग सगळ्या मला पुन्हा पुन्हा गंमतीने चिंचा खाऊन चेहरा वेडावाकडा करुन दाखव म्हणत असे… आणि पोट धरुन मनसोक्त हसत असे..कारण घरात बापाच्या धाकाने हसू कधी फुलायचे नाही..
बहीणी नेहमीच त्या कशा ठुमकत चालतात कशा लाजतात कशा वागता बोलता ते मी निरीक्षण करत असायचो… आणि तसंच करुन बघायचो…हा नित्य क्रम बनला होता…पण लहान आहे म्हणून फारसं कुणी मनावर घेत नव्हतं आणि मला तर काही समजतच नव्हतं..
मोठा दादा शाळेत जायचा घरी असला तरच त्यांच्यासोबत खेळायला मिळायचं..
पण मला मोठी बहीण आक्का,लहान ताई यांच्यासोबतच खळायलाआवडत होतं…
आईने तर आक्कावरच मला सांभाळण्याची पुर्ण जबाबदारी टाकली होती… बहीणी खूप हुशार होत्या..सगळी कामे जिथल्या तिथे करत असायच्या… त्यामुळे आईला तिच्या प्रोफेशन साठी वेळ मिळत होता.
मी आता शाळेत जावू लागलो होतो…बाॅईज स्कुल होते..गणितात जरा कच्चा लिंबू होतो.. म्हणून स्कुलच्याच एक टिचरकडे माझा क्लास सुरु झाला…
टिचरला मुलबाळ नव्हते मला मुलासारखं जपत गोड बोलून त्या गणितं शिकवत सगळा अभ्यास करून घेत असे… कधीतरी टिचरने गोडधोड बनवलेला खाऊ मिळायचा..मग काय दिपकची मज्जाच मज्जा होती घरीदारी…पण गणित फारसं पुढे सरकले नाही पास होण्या पुरताच दिपकने मेंदूवर गणिताचा लोड घेतला होता …लाडाने मात्र प्रगती केली होती…
हळूहळू दिवसामागून दिवस सरत होते.. दैनंदिन रुटीन तेच होते… प्रायमरी शिक्षण संपलं आणि हायस्कूलमध्ये दाखल झालो…सहावी सातवीत आल्यावर आता जरा समज येत होती… काही तरी शरीरात बदल जाणवत होते… वर्गात मुलांशी खेळणे,बोलणे,तर बेंचवर मुलांचा,मित्रांचा स्पर्शही आवडत नसायचा…मी सतत गृप मधे मिक्स होणं टाळता रहायचो…मलाही काही उमजत नव्हते माझे वागणे…मला मुलामुलींच्या शाळेत टाकावं असं वाटायचं.. मैत्रीणी हव्या मित्र नकोच असं जाणवायचं..
घरभर दुडदुडणारा दिपक आता बायकी शब्द बोलायचा ,मुलींच्या चालीत चालायचा, वागायचा…घरात सगळे रागवायचे मग दडपणाने मुलासारखंही वागत होतो…पण
घरात कुणी नसले कि बहीणीच्या रुममध्ये अभ्यास करायला बसायचो आणि दरवाजा बंद करुन लहान बहीणींचे कपडे घालून आरशात स्वतःला न्याहाळत बसायचो…
पण एक दिवस अचानक.. !
क्रमशः पुढच्या भागात
© सविता दरेकर
नाशिक