अंतरीचा आवाज भाग-8
एक दिवस उमा म्हणाली.. “दिपक तू काही काम का नाही करत.. हवं तर तुझं नाटकात काम पुन्हा सुरु कर.. घरात काय बसतो बायका सारखं”
… मला बरं वाटलं ऐकून.. कारण मी पुन्हा नाटकात काम करण्याच्या विचारात अडकलो होतो..
पण बरेच दिवस उमाचे माझे पटेना…घरात रोजचच भांडण कलह वाढत होता…उमाचे तिच्या घरच्या गरीबीमुळे लग्न होत नव्हते वय वाढत होते.. पण माझ्या शी लग्न करून ती पुर्ण फसली होती..
वयाने मी लहान होतोच पण बीन कामाचा नवराही होतो…तीची घुसमट मला कळत होती.. पण मी काही करु शकत नव्हतो..
ती रोजच घरात आदळ आपट करीत होती…कामही करत नसे..
असं वातावरण सगळ्यासाठी मनस्ताप निर्माण करत होते. एक दिवस सकाळी अचानक वडलांना त्रास होवू लागला… डॉक्टरकडे घेवून गेलो पण काळाने त्याचं काम केले होते..
वडील हार्टफेलने आमच्यातून ..निघून गेले…
आता घरात फक्त बायकांच राज्य होतं..
मला कामही नसायचं आणि रागवणारंही आता कुणी कर्ता पुरुष घरात नव्हता…
हळूहळू उमाशी माझी मैत्री झाली.. कारण तिला एका शाळेवर नोकरी मिळाली.. तिचा वेळ जावू लागला.. त्यातच तिचे एका शिक्षकांशी प्रेम जुळले… मी तिला सपोर्ट केला..मला जाणवले,माझ्याशी लग्न लावून तिच्यावर झालेल्या अन्यायाची ती परतफेड होती..
आता आम्ही दोघे घरातून बाहेर पडू लागलो.
मी नाटक कंपनीत काम करत होतो आणि ती शाळेवर.. माझे शो बरेचदा रात्री पर्यत असायचे.. मग उमा तिच्या प्रियकर सोबत फिरुन पुन्हा शो बघायला यायची.. व घरी जाताना आम्ही दोघे सोबत जायचो… दिवस भराभर जात होते.. मी उमाला लग्न करुन टाका असे सांगितले..
पूर्ण सेटल होईपर्यंत उमाशी लग्न करायला तो तयार होईना.. म्हणून ती तोपर्यंत आमच्या घरीच रहात होती… हे माझ्या शिवाय घरात कुणालाही माहिती नव्हते…
आम्ही दोघं हसतखेळत सकाळी निघायचो ते रात्री परत यायचो.. त्यामुळे घरातले सर्व आमचं चांगलं पटतं असंच सगळे समजत होते…. पण मी नाटकात स्री पात्र करत होतो..सकाळी उमा सोबत जाताना रात्री येताना जीन्स टिशर्टवर असायचो…
एक दिवस नाटक उशिरा संपल्यानंतर रात्री येताना उशीर झाला…आणि मला साडीवरच निघावे लागले.. उमा व मी घरात आलो.. भाभी ने बघितले… पण काही नाही म्हणाली.. पटकन रुममधे कपडे बदलले…
आई आक्का रागवायच्या..पण आता घरात कुणी पुरुष नव्हता. मला भीती वाटत नव्हती..नाटकात कामाचे पैसे मिळत होते.. म्हणून परावलंबी नव्हतो… मग रोजच नाटक संपले कि तशाच पोषाखात घरी येवू लागलो..
कारण उमा म्हणाली कि “रात्री स्री सोबत असली कि लोकांच्या नजरा टळतात..दोन स्रीया सोबत असल्याने हिंमत वाटते.. तू असाच साडीवर चल”
ती शाळा सुटली कि तिच्या बाॅयफ्रेंडसोबत फिरून मग नाटक कंपनीत येत होती आम्ही सोबत गेलो आलो असे घरातले समजत रहावे म्हणून सगळं चाललं होतं.. यामुळे उमाशी विश्वासू मैत्री वाढत होती.. पण तीची मैत्री फार काळ टिकली नाही.. ती स्वार्थी होती.. माझा फक्त भावनिक स्तरावर वापर करत होती…
हळूहळू आक्काच्या लक्षात आलं.. तिला उमाचं वागणं खटकत होतं.. त्यांच्यात माझ्या वरुन वाद होवू लागले.. पण उमा उद्धट होती तिला फरक पडत नसे.. मीही मनावर घेत नव्हतो..
एक दिवस उमा ने मला फोन केला..
” दिपक तू नाटक संपले कि डायरेक्ट तसाच साडीवर रेल्वे स्टेशनला ये.. आपण कन्याकुमारीला जातोय..” तुला आल्यावर सगळं सांगते तू ये पटकन..
तुझी बॅग भरुन आणलीय मी.. आणि आईलाही विचारले आहे.. मला आठ दिवस शाळेला सुट्टी आहे मग पिकनिक ला जायचय तू आहे सोबत म्हणून आईने परवानगी दिली…
मी गेलो तेव्हा टिकीट घेऊन ती तिच्या प्रियकरासोबत माझी वाट बघत होती.. मला वाटले मी सोबत असल्यावर कुणाला संशय नको म्हणून तिने मला नेले…
पण खरं कारस्थान तर वेगळंच होतं.आम्ही कन्याकुमारीला पोहचलो.. तिथे एका हाॅटेल वर आधीच रुम बुक होत्या… मला कळेना काय चाललय.. मी काहीही विचार न करता उमा वर विश्वास ठेवून आलो होतो..
माझ्याशी लग्न करून तिचे आयुष्य बरबाद झाले याची खंत मला होती.. म्हणून तिच्या आयुष्यात सुख मिळावं तिला तिचा जोडीदारासोबत आनंद मिळावा म्हणून ती सांगेल ते ऐकत राहीलो व मदत करत होतो…
पण त्या दोघांनी चक्क माझा सौदा केलेला होता ही गोष्ट मला कन्याकुमारीला पोहचल्यावर कळाली.. आणि मला धक्का बसला..!
हॉटेल मधे ते दोघे एक रुममधे व मला एक व्यक्ती सोबत दुसऱ्या रुममधे माझे सामान दिले.. मी चिडून म्हणालो.. उमा आपण दोघं एक रुममधे थांबु मला भीती वाटतेय इथे..
मग होहो म्हणत ती सोबत रुममधे आली..
प्रवास खूप झाला होता थकवा आल्याने मी फ्रेश होवुन चेंज करावं म्हणून बॅग उघडली तर त्यात सर्व साड्या होत्या..
मी परत चिडून बोललो.. “उमा माझे कपडे शर्ट पॅट कुठय यात साड्याच का? डोकं फिरलय का तुझं.. ”
यावर ती हसत राहीली आणि म्हणाली.. “आता हेच तुझं आयुष्य आहे आणि ते गुपचुप स्विकारण्यातच तुझी भलाई आहे ” येते मी.. आता इथे जी व्यक्ती येतेय त्याच्याशी एन्जॉय कर बाय…
उमा निर्दयीपणे वागली मी मात्र शुन्यात गेलो.. तेवढ्यात एक माणूस आत आला… मला परीस्थितीचा अंदाज आला.. मला फसवून प्लॅन करुन आणले गेले होते..
माझं वय बावीस फक्त उमाचं अठ्ठावीस तर या पन्नाशीच्या पुरुषानं उमाला वीस हजार रुपये दिवुन मला विकत घेतलं होतं…असं मला सांगितले गेले..
मी गयावया करत रडत होतो.. कुणाला दया येईना.. ओरडू शकत नव्हतो.. कारण मी स्री वेशात आलो होतो.. कोण विश्वास ठेवणार माझ्यावर आणि मला जीवानिशी मारू शकत होते हे लोक.. ही भीती भरुन मला ताप भरला होता. या माणसाची बायको म्हणून माझं नाव बुक केलं गेलं होतं..
आणि पुढे पंधरा दिवस या माणसाने व उमाच्या प्रियकराने दिपकवर सतत बलात्कार करत अमानुषपणे हत्याचार केले…उमा पैसे घेऊन निर्दयी झाली होती..
यातच दिपक ची तब्बेत सिरीयस झाली त्याला उमा ने अॅडमिट केले.. दोन दिवसांत थोडंसं बरं वाटल्यावर घरी केरळला घेऊन आली… पण छोटासा अपघात झाला यापेक्षा वेगळे काही घडले नाही हे न सांगण्याच्या बोलीवरच..!
आणि इथूनच सुरु झाला दिपकमधल्या दिपिकीचा संघर्षमय प्रवास….!
क्रमशः
सविता दरेकर