38 कोटी निधीच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन थेट गटारातून
इगतपुरी : प्रतिनिधी
पावसाचे माहेरघर संबोधल्या जाणार्या इगतपुरी शहरात नगरपरिषदेचा तलाव व तळेगाव डॅममधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, प्रत्येक वर्षी मार्च व एप्रिल महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासत असल्याने सन 2018 मध्ये भावली डॅमचे पाणी शहरात आणण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि गत सत्तेत असणार्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून शासनाकडून 38 कोटी रुपये
निधी आणला.
दोन वर्षांच्या कालावधीचे पाइपलाइनचे काम मुदतीनंतरही दोन वर्षांपर्यंत केले. सन 2022 ला सुमारे चार वर्षांनंतर ही पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांपासून भावली डॅमचे पाणी शहरात आले असतानाही आजही नागरिकांना रोज पाणीपुरवठा न करता आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठा केला जाईल म्हणून गेल्या दोन वर्षांपासून नळाचे मीटर दिले असून, प्रत्यक्षात जोडणी केलेली नाही. मात्र, दोन वर्षांपासून नवीन दरपत्रकाप्रमाणे पाणीपट्टीची वसुली केली जात असून, नागरिकांना फसवण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे.
पाइपलाइनचे काम करणार्या संबंधित ठेकेदाराने केलेली पाइपलाइन इस्टिमेंटप्रमाणे न टाकता काही ठिकाणी जुन्याच पाइपलाइनला जोडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी लोखंडी पाइप न वापरता रबरी व प्लास्टिक पाइप वापरल्याने अनेक वेळा पाइपलाइन फुटून पाणी वाया गेल्याचे दिसून आले आहे. नळजोडणी करतेवेळी प्लास्टिकची पाइपलाइन दिल्याने अनेक ठिकाणी पाइप लिकेज आहे तर काही ठिकाणी जुन्याच पाइपलाइनला मुख्य पाइपलाइन जोडली आहे.
अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या पाइपलाइनमध्ये गटार, नाल्याचे व शौचालयाचे घाण पाणी घुसत असून, नव्या पाइपलाइन जोडलेल्या पाइपामधून पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या पाइपलाइनद्वारे शहराला पाणीपुरवठा होत असून, अशा दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरात साथीचे रोग पसरले असून, अनेक नागरिकांना उलट्या, जुलाब, अतिसारसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
काम केवळ कागदावरच पूर्ण
शहराला पाणीपुरवठा करणारी ही योजना पूर्ण झालीच नाही. मात्र, ठेकेदाराने तत्कालीन मुख्याधिकार्यांना हाताशी धरून पूर्ण बिल वसूल केले. तत्कालीन मुख्याधिकार्यांनी शहरातील पाइपलाइन पूर्ण झाल्याचे पाहिलेच नाही. पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असून, केवळ कागदावरच पूर्ण झाल्याचे दाखवले आहे.
नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका
शहराला पाणीपुरवठा करताना पाण्याचे शुद्धीकरण होत नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तरीही पाणीपट्टी वसुलीचा धाक ठेवून प्रशासन मनमानी करीत आहे. वेळीच ठेकेदाराने नाल्या, गटार व शौचालयाजवळील पाइपलाइन बदलली नाही तर नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची नगरपरिषद प्रशासन काळजी घेईल का? की फक्त पाणीपट्टी, घरपट्टी वसुली करतील, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.