नाशिक : प्रतिनिधी
शहरात बुधवारी (दि. 18) पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. काही वेळ विश्रांती घेत दिवसभर पाऊस सुरू होता. बुधवारी (दि. 18) 8.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पावसाची कोसळधार सुरू होती.
पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. शहरातील सातपूर, नाशिक रोड, सिडको, पंचवटी, उपनगर या भागात दिवसभर पावसाची संतधार सुरू होती. हवामान विभागाकडून यलो अलर्ट नाशिक जिल्ह्याला दिला होता.
पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मे महिन्यातही जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपले होते. आता मॉन्सून दाखल झाल्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे.
सखल भागात पाणी
शहरात सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधाारकांसह रस्त्यावरून चालणार्यांना, पादचार्यांनाही पाण्यातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र होते.
अपघातांच्या प्रमाणात वाढ
पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांंचा अंदाज न येऊन अपघात होत आहे. पावसामुळे रस्त्यावरून दुुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
धरणांच्या साठ्यात अंशत: वाढ
शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील ओढे, नद्या, नाले वाहते झाले आहेत.