जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये मॉन्सून दाखल झाल्यामुळे यंदा 19 जून रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. नाशिक शहरासह जिल्हाभरात दमदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्र्यंबकेश्वर, गिरणारे या परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सध्या 6,336 क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहत असून, रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे.
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला 10 जुलैपर्यंत यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहरात सोमवारी (दि. 7) सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 12.6 मि.मी. पाऊस झाला. पावसाचे पाणी शहराच्या सखल भागांत साचले. शहरातील सराफ बाजार परिसरात पावसाचे पाणी व गटारातून गोदावरी नदीच्या पुराचे पाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. शहरात सातत्याने सरी कोसळत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत.
गोदावरीला पूर आल्यानंतर नागरिकांकडून तो पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी केली जाते. राज्यभरातून रामकुंडावर आलेले पर्यटकही गोदावरीच्या पुराचा आनंद घेत फोटोसेशन करण्यात दंग होते.

जिल्ह्यात विक्रमी पाऊस

नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सरासरी 174 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना 223 मि.मी. पावसाची नोंद झाली. संपूर्ण जुलैमध्ये सरासरी 69 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना, 6 जुलैपर्यंतच जिल्ह्यात 55.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *