शहरात संततधार, गोदेला पुन्हा पूर

जनजीवन विस्कळीत, गंगापूरमधून विसर्ग

नाशिक : अश्‍विनी पांडे
शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे. तर पावसामुळे शहरातील रस्तेही खड्डयांत गेले आहेत. गंगापूर धरणांत झालेल्या पाणी साठ्यामुळे सात हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदाकाठ भागात यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सायखेडा, चांदोरी भागातही प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
हवामान खात्याने नाशिक जिल्ह्याला आँरेज अलर्ट दिलेला आहे. कालसकाळपासूनच शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे गंगापूर, दारणा धरण क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने सकाळी पाच हजारांचा असलेला विसर्ग सायंकाळपर्यंत सात हजारांपर्यंत करण्यात आला. पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे. वेधशाळेने पुढील चार दिवस नाशिकसह राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. त्र्यंबकेश्वर व आंबोली घाट परिसराबराबेरच इगतपुरीच्या काही भागात पावसाचा जोर कायम राहिला. गंगापूर धरण 95 टक्के भरले असून, धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीला पूर सदृश्य परिस्थिती पहायला मिळाली. पुराचे मापन असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागले आहे.

दहा धरणांतून विसर्ग
जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. छोटे नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहे. गंगापूरसह जिल्ह्यातील दहा धरणांतून विसर्ग सुरु आहे

धरणनिहाय विसर्ग
गंगापूर – 7000
दारणा – 4 हजार 316
मुकणे – 726
कडवा – 2 हजार 499
वालदेवी – 407
आळंदी – 87
भोजापूर – 539
पालखेड – 3 हजार 408
नांदूरमध्यमेश्‍वर – 17 हजार 689

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *