पर्यायी मार्गाने होणार वाहतूक
सिडको : विशेष प्रतिनिधी
द्वारका सर्कल येथील अंडर-पासच्या बांधकामामुळे पुढील तीन महिन्यांसाठी द्वारका चौक परिसरात सर्व अवजड वाहने, खाजगी प्रवासी बसेस, एसटी बसेस, तसेच सिटीलिंक बसेस यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पार्श्वभूमीवर सुरू होणार्या या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
द्वारका चौक येथे शहरातील चार प्रमुख रस्ते व सात उपरस्ते एकत्र येत असल्याने बांधकाम काळात वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जड-अवजड वाहने व प्रवासी बसेस यांना द्वारका चौकात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. नाशिककडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत ठरविण्यात आलेल्या मार्गानेच वाहतूक करू शकणार आहेत. एसटी बसेससाठी नाशिकरोड, मुंबई नाका, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, वडाळा, लेखानगर, ठक्कर बझार, निमाणी बसस्थानक आदी मार्गांवरून स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुणे, सिन्नर, धुळे, मालेगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आदी दिशांना जाणार्या एसटी बसेससाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. सिटीलिंक बसेस शालिमार, नाशिकरोड, तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल येथून पर्यायी मार्गाने धावणार असून, निमाणी बसस्थानकातून सुटणार्या सर्व सिटीलिंक बसेस तपोवन टर्मिनल येथूनच चालविण्यात येणार आहेत.
हलक्या वाहनांसाठीही पुणे, मुंबई, पुणे, त्र्यंबकेश्वर, मुंबई नाका नाशिकरोड व नाशिकरोड, पंचवटी या दिशांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. काठे गल्ली, वडाळा नाका,
फेम सिग्नल, ट्रॅक्टर हाउस, सारडा सर्कल आदी ठिकाणी हाइट बॅरिअर पॉइंट उभारण्यात येणार आहेत. ही अधिसूचना प्रायोगिक तत्त्वावर दि. 30 जानेवारी 2026 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत लागू राहणार आहे. आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा व मुदतवाढ देण्यात येणार आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिला आहे.
Heavy vehicles banned for underpass work at Dwarka Circle