तिचा जन्म उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये १५ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. अॅमिटी विद्यापीठातून तिने मीडियाशी संबंधित मास कम्युनिकेशन म्हणजे जनसंज्ञापन व पत्रकारिता विषयाची पदवी घेतलेली आहे. एक अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून तिने नाव कमावलेले आहे. मनोरंजन वाहिन्यांवरील अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. बडे भैय्या की दुल्हनिया, सात फेरो की हेराफेरी, मेरी दुर्गा, यह रिश्ता क्या कहलता है इत्यादी मालिकांमध्ये तिने भूमिका केलेल्या आहेत. एमटीव्हीच्या रिअॅलिटी शोमध्येही ती चमकली. सन २०२१ साली ती बिग बॉसमध्ये ती १३ व्या क्रमांकावर आली. सोशल मीडियावर ती सतत चर्चेत असते आणि आता, तर ती रस्त्यावरही बिनधास्त उतरली आहे. सोशल मीडियावर ती असे व्हिडिओज् व्हायरल करते की, अनेकांना अचंबा वाटतो आणि अनेक जण तिला ट्रोल करतात. तिला लाजलज्जा नाही, अशी टीकाही होत असली, तरी ती कोणालाही घाबरत नाही आणि कोणालाही बिनधास्त उत्तर देत असते आणि आपले म्हणणे बिनधास्त मांडत असते. राजकीय नेत्यांचेही तिने लक्ष वेधून घेतले आहे. अशी ती कोण? हा प्रश्न पडायचे काही कारण नाही. इतके वर्णन केल्यानंतर तिचे नाव सांगण्याचे काही कारणही नाही. पण, तिच्यावरुन जाहीर वादही व्हायला लागले आहेत. ती महिला असल्याने पुरुष नेते काही अपवाद वगळता या वादापासून चार होत दूरच आहेत. तिला विरोध करणारे जसे आहेत, तसे तिचे समर्थन करणारेही आहेत. हा प्रश्न महिलांचा असून, दोन महिला नेत्या तिच्यावरुन भांडत बसल्या आहेत. भांडण लावून देणारी ती कोण? हे आता लक्षात आले असेलच. ती म्हणजे बडे भैय्या की दुल्हनियामधील अवनी पंत, चंद्रा नंदिनीमधील छाया, मेरी दुर्गामधील आरती, सात फेरो की हेराफेरीमधील कामिनी जोशी, यह रिश्ता क्या कहलता हैमधील शिवानी भाटिया. इतकेच नाही, तर पियाली, नंदिनी या नावांनीही तिने मालिकांत भूमिका केल्या आहेत. अशी ती. तिच्या तोकड्या कपड्यावरुन तिने अलीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती मुंबईमध्ये भररस्त्यात नंगानाच करते, असा तिच्यावर आरोप असून, तिच्यावर कायदेशीर करावी करावी, अशी मागणी केली जात असली, तरी अद्याप तिच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही आणि महिला आयोगाने तिच्या नंगानाचची दखल घेतलेली नाही. त्यामु़ळे वाद काही थांबत नाही.
नंगानाचवरुन भांडण
तक्रार करण्यात आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एक सडेतोड भूमिका घेतली. “प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत, हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातूनही कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला, तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांनाही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळे आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही.” ही महिला आयोगाची भूमिका तक्रारदार महिलेची तक्रार निकालात काढणारी ठरली. यावर महिला आयोगावर तक्रार महिला नेत्या बरसल्या. “आयोगाचं काम महिलांचा सन्मान जपणं, मान राखणं आहे. मग, उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना आयोगाला जाब विचारावासा वाटला नाही. कारण, त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. मग, वेळ कशासाठी घालवायचा आहे. एखादी महिला मुंबईत उघडी-नागडी फिरत आहे. समाजमाध्यमांत अश्लील, घाणेरडे व्हिडिओज् व्हायरल होत असताना स्वत:हून तक्रार दाखल करुन कारवाई का केली नाही. यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर, मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही.” असे तक्रारदार महिला नेत्या म्हणतात. कोणाचे बरोबर? हे कोण ठरवणार? ज्याने त्याने ठरवावे. महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर एक जाहीर आरोप करण्यात आला होता की, अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडिताला महिला आयोगाने नोटीस पाठवली. मात्र, नंगानाच करणाऱ्या अभिनेत्रीला जाणीवपूर्वक नोटीस पाठवत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप चुकीचा असल्याचे कारण देऊन आरोप करणाऱ्या महिला नेत्याला नोटीस पाठवली. महिला आयोगाने तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती, असा खुलासा महिला आयोगाने केला. खोटी माहिती देऊन आणि आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेतल्याबद्दल आयोगाने नोटीस पाठविली. तक्रार, आरोप आणि नोटीस यामागे दोन महिला नेत्यांचे पक्षीय राजकारण असल्याचे लपून राहिलेले नाही. या नोटिशीला उत्तर देण्यात आले. नंगानाचविरुध्द आपला लढा सुरुच राहणार असल्याचा निर्धार तक्रारदार महिला नेत्याने कायम ठेवला आहे. नंगानाचचे पुढे काय होणार, हा औत्सुक्याचा प्रश्न आहे.
ती काय म्हणते?
जिच्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे, ती काय म्हणते? हेही समजावून घेतले पाहिजे. अंगभर कपडे घातल्यानंतर अॅलर्जी होत तिने असल्याचे म्हटले आहे. अंगभर कपडे घातल्यामुळे तिच्या त्वचेला त्रास होतो, असा तिचा दावा आहे. अर्थात, तिची अॅलर्जी तिलाच माहिती. सतत होणार्या टीकेमुळे आत्महत्या करण्याचा विचारही करु शकेन, असेही तिने म्हटले आहे. तिने खरोखरच टोकाचे पाऊल उचलले तर? तक्रारदार महिला नेत्याचे छायाचित्र शेअर करत ती म्हणते, ” या त्याच महिला आहेत, की राष्ट्रवादीमध्ये असताना संजय राऊत यांच्या अटकेची मागणीसाठी ओरडत होत्या. नंतर यांच्या पतीला लाच घेताना पकडण्यात आले. आपल्या पतीला वाचविण्यासाठी यांनी भाजपात प्रवेश केला आणि नंतर चित्रा व संजय अत्यंत चांगले मित्र झाले. मीदेखील भाजपात जाणार आहे, त्यावेळी आम्ही ‘बेस्ट फ्रेंड्स’ होऊ.” प्रश्न इतकाच की, तिला भाजपात प्रवेश मिळाला तरच. तिने तुरुंगात जाण्याचीही तयारी दर्शविली. पण, ‘त्यांनी’ आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या संपत्तीचा खुलासा केला पाहिजे आणि एक नेता किती आणि कोठून कमावतो, हे सांगितले पाहिजे, असेही तिने म्हटले आहे. जावेद अख्तर यांची ती नातेवाईक असल्याचे बोलले जात होते. पण, तसे काही नाही. पण, तिचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही, असे जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी खुलासा २०२१ मध्ये केला होता. तिने म्हणजे उर्फी जावेदने देखील वैतागून एक टी शर्ट घालून त्यावर ‘मी जावेद अख्तर यांची नात नाही’, असे ठळक अक्षरात लिहिले होते. अशी ही उर्फी. चित्रविचित्र फॅशनमुळे उर्फी कायमच चर्चेचा विषय बनली आहे. ती सध्या चर्चेत आहे. तिची कथाच वेगळी!