31 जानेवारीला गोंदे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन
सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा अन्यायकारक मार्ग-बदल कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही, असा इशारा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देत दिला आहे. या मागणीसाठी 31 जानेवारी रोजी गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी हरिभाऊ तांबे, भाऊसाहेब शिंदे, प्रा. राजाराम मुंगसे, विठ्ठल जपे, राजाराम मुरकुटे, आनंदा सालमुठे, संदीप उगले यांच्यासह नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे ही सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण या नैसर्गिक, औद्योगिक व लोकाभिमुख मार्गानेच जावी, अशी ठाम भूमिका कृती समितीने मांडली आहे. हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या योग्य, लोकसंख्येने समृद्ध व औद्योगिकदृष्ट्या सक्षम असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
ही रेल्वे उद्योजक, व्यापारी, आयटी क्षेत्रातील युवक, पुण्यात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार असून, या मार्गाने प्रकल्प राबविल्यास नाशिक ते पुणे प्रवास अवघ्या पावणेदोन तासांत शक्य होणार आहे. यामुळे रोजगार, उद्योग, शिक्षण व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचेही नमूद करण्यात आले.
काही घटकांच्या दबावाखाली लोकहित डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, हा मार्ग डावलणे म्हणजे नाशिक जिल्ह्यावर अन्याय असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात सर्व नागरिक, उद्योजक, विद्यार्थी व विविध संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.
High-speed rail route change not acceptable