अर्ज असलेल्या वाहनाचा पाठलाग, गेट ढकलून कार्यकर्त्यांचा गोंधळ

सिडको : विशेष प्रतिनिधी
इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच तिकीट मिळण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ जवळ येत असतानाच भाजपच्या अनेक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म न मिळाल्याने विल्होळी येथील व्हिजन व्हिला परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एबी फॉर्म वितरणाबाबत स्पष्टता नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यातच भाजपच्या काही इच्छुक उमेदवारांनी थेट एबी फॉर्म घेऊन जाणार्या गाड्यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे यासुद्धा या ताफ्यामध्ये होत्या. यानंतर भाजपकडून पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. यावेळी काही इच्छुक उमेदवारांकडून तिकीट वाटपाचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोपदेखील करण्यात आला.
एबी फॉर्मबाबत संभ्रम असल्याने अनेक इच्छुकांना आपला फॉर्म दुसर्यालाच देण्यात आला की काय, अशी शंका वाटत होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पदाधिकार्यांनी इच्छुकांना एकेक करून आत बोलावले. यावेळी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले, तर काहींना प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, वेळ अत्यल्प असल्याने एबी फॉर्म मिळताच उमेदवार विभागीय कार्यालयाकडे धाव घेताना दिसून आले. माजी नगरसेविका अलका अहिरे यांचे पती कैलास अहिरे यांनी एबी फॉर्म न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
तसेच उमेदवारी न मिळालेल्या इतर इच्छुकांनीही नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षे पक्षासाठी काम करूनही आपल्याला डावलण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक तास शिल्लक असताना काही मोजक्याच इच्छुकांना ऐनवेळी एबी फॉर्म देण्यात आल्याने भाजपच्या अंतर्गत नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत
आहे.
अनेक नाट्यमय घडामोडी :
मंत्री गिरीश महाजन यांनी देखील तिकीट वाटप सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली होती. तसेच, कारागृहात असलेल्या भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते सुधाकर बडगुजर यांनीदेखील अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने शड्डू ठोकलाय. आता नाशिक महापालिका निवडणुकीत सर्व पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपमध्ये गैरसमजामुळे उडलेला गोंधळ; सर्व उमेदवार सक्षम
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले असून सर्वेक्षण, सामाजिक समीकरण आणि निवडून येण्याची क्षमता पाहून योग्य वाटप केले असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. पक्षाने 100 एबी फॉर्म व्यवस्थित वाटप केले, परंतु उर्वरित फॉर्म देताना काही कार्यकर्ते व पदाधिकार्यांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने थोडा गोंधळ उडला. तरीही पक्षाने सर्व 122 जागांसाठी सक्षम उमेदवार उभे केले आहेत आणि पक्षाने दिलेला नारा पूर्ण केला जाईल. त्यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा गैरसमज दूर झाला असून आता सर्वजण एकजुटीने काम करत आहेत, केंद्र व राज्य सरकारचे विकासकामे, सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या योजना, सुशासन आणि आगामी कुंभ मेळ्यासाठी होत असलेली तयारी ही सर्व मुद्दे नाशिककर मतदारांसमोर मांडण्यात येणार आहेत. यामुळे पुन्हा नाशिक महानगर पालिकेत भाजपचा झेंडा फडकवण्याचा पक्षाचा मानस आहे. असे भाजपचे शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी सांगितले.
1200 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या, तर केवळ 122 उमेदवारांना तिकीट द्यायचे होते. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी होणे साहजिक आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
– ना. गिरीश महाजन, सिंहस्थ मंत्री
दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार सीमा हिरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी एबी फॉर्मसह व्हिजन व्हिला येथे उपस्थित असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी धाव घेतली. काही इच्छुकांनी थेट व्हिलामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने संतप्त इच्छुकांनी दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. या घटनेनंतर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
फॉर्म पळवले जात असल्याचा आरोप
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून केवळ निवडणूक लढविण्यासाठी पक्षात आलेल्या आयाराम-गयारामांना एबी फॉर्म दिल्याच्या आरोपावरून भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार वाद झाला. काही पदाधिकारी एबी फॉर्म घेऊन जात असताना इच्छुकांनी आमचे फॉर्म पळवले जात असल्याचा आरोप करत त्यांचा पाठलाग केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पदाधिकारी घटनास्थळावरून निघून गेले. या गोंधळाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
High voltage drama from AB form in Nashik