अपघाताची भीती; नागरिक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
लासलगाव : वार्ताहर
देवगाव फाटा-देवगाव-रुई या मार्गावर सध्या अवजड हायवा (डंपर) वाहनांची भरधाव वाहतूक सुरू असून, त्यामुळे गंभीर अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. चालकांकडून वेगावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नसल्याने तसेच निष्काळजीपणे वाहन चालवले जात असल्याने स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
देवगाव येथे सुमारे 1600 विद्यार्थ्यांची संख्या असलेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून, या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थ्यांची ये-जा असते. मात्र, अवजड वाहतूक करणार्या हायवा गाड्या एकामागोमाग तीन ते चार वाहनांच्या ताफ्यातून भरधाव धावत असल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मागील आठवड्यात देवगाव फाटा परिसरात सुनंदा बोचरे यांच्या शेतात काम करणार्या शेतमजुराला हायवा वाहनाने अचानक कट मारल्याची घटना घडली. यावेळी तो रस्त्यालगतच्या विहिरीत पडता पडता थोडक्यात बचावला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत भरधाव वेगाने जाणारा ट्रक देवगाव सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय बोचरे यांच्या घराशेजारील शेडमध्ये घुसून पुढे विलास बोचरे यांच्या द्राक्षबागेत शिरल्याची घटना घडली. संबंधित ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने ही घटना घडण्याच्या सुमारे अर्धा तास आधीच शाळा सुटली होती. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मागील पंधरवड्यात स्थानिक नागरिकांनी या अवैध व बेदरकार अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित वाहनचालकांकडून ग्रामस्थांनाच दमबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मार्गावर सुरू असलेल्या अवैध व भरधाव अवजड वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, वेगमर्यादा लागू करावी तसेच पोलिस व प्रशासनाने नियमित पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात मोठा व जीवघेणा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थ ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरील अवैध व भरधाव हायवा वाहतुकीचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच संबंधित वाहनचालक व मालकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन उभारावे लागेल.
– सुनंदा बोचरे, देवगावकाही दिवसांपूर्वी भरधाव ट्रक द्राक्षबागेत घुसल्याची घटना घडल्याने परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट झाले आहे. म्हणून प्रशासनाने तातडीने या मार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवून नियमित पोलिस बंदोबस्त करावा व नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करावी.
– नीलेश शिंदे, ग्रामस्थ, देवगाव
Highway running on Devgaon Phata-Rui route