नाशिक

देवगाव फाटा-रुई मार्गावर धावताहेत हायवा

अपघाताची भीती; नागरिक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लासलगाव : वार्ताहर
देवगाव फाटा-देवगाव-रुई या मार्गावर सध्या अवजड हायवा (डंपर) वाहनांची भरधाव वाहतूक सुरू असून, त्यामुळे गंभीर अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. चालकांकडून वेगावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नसल्याने तसेच निष्काळजीपणे वाहन चालवले जात असल्याने स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
देवगाव येथे सुमारे 1600 विद्यार्थ्यांची संख्या असलेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून, या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थ्यांची ये-जा असते. मात्र, अवजड वाहतूक करणार्‍या हायवा गाड्या एकामागोमाग तीन ते चार वाहनांच्या ताफ्यातून भरधाव धावत असल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मागील आठवड्यात देवगाव फाटा परिसरात सुनंदा बोचरे यांच्या शेतात काम करणार्‍या शेतमजुराला हायवा वाहनाने अचानक कट मारल्याची घटना घडली. यावेळी तो रस्त्यालगतच्या विहिरीत पडता पडता थोडक्यात बचावला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत भरधाव वेगाने जाणारा ट्रक देवगाव सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय बोचरे यांच्या घराशेजारील शेडमध्ये घुसून पुढे विलास बोचरे यांच्या द्राक्षबागेत शिरल्याची घटना घडली. संबंधित ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने ही घटना घडण्याच्या सुमारे अर्धा तास आधीच शाळा सुटली होती. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मागील पंधरवड्यात स्थानिक नागरिकांनी या अवैध व बेदरकार अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित वाहनचालकांकडून ग्रामस्थांनाच दमबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मार्गावर सुरू असलेल्या अवैध व भरधाव अवजड वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, वेगमर्यादा लागू करावी तसेच पोलिस व प्रशासनाने नियमित पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात मोठा व जीवघेणा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थ ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरील अवैध व भरधाव हायवा वाहतुकीचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच संबंधित वाहनचालक व मालकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन उभारावे लागेल.
– सुनंदा बोचरे, देवगाव

काही दिवसांपूर्वी भरधाव ट्रक द्राक्षबागेत घुसल्याची घटना घडल्याने परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट झाले आहे. म्हणून प्रशासनाने तातडीने या मार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवून नियमित पोलिस बंदोबस्त करावा व नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.
– नीलेश शिंदे, ग्रामस्थ, देवगाव

Highway running on Devgaon Phata-Rui route

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago