मराठीचा सन्मान वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करणार
स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : विनायक कुलकर्णी
राज्यात हिंदी भाषासक्ती केली जाणार नाही, याचा पुनरुच्चार करून यापुढील काळात मराठीचा सन्मान वाढविण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून येथे सुरू असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळ अध्यक्ष मिलिंद जोशी, जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई, ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी, रोजगार हमीमंत्री भरत गोगावले, महामंडळ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आगामी शंभरावे मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे, असे जाहीर करण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ही संवादापुरती मर्यादित न राहता रोजगार व्यवसाय, तंत्रज्ञानाची झाली पाहिजे. यासाठी जे जे करावे लागेल ते शासन करणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे. मराठी भाषा ही आपली ओळख,अस्मिता आहे. यासाठी भाषा विकासावर भर दिला जाणार आहे. संमेलन म्हणजे आपल्या भाषेचा उत्सव होय. साहित्यिकांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली, समाजाला दिशा दिली, आहे असे त्यांनी सांगितले.
महामंडळ अध्यक्ष जोशी यांनी सांगितले की, आगामी 100 वे मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असून, त्याचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे.
अनुवाद समितीची फेररचना करणार : सामंत
मराठी भाषामंत्री सामंत यांनी सांगितले की, नजीकच्या काळात अनुवाद समितीची फेररचना करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करण्यात येणार आहे. समिती यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने कार्यरत राहणार आहे. गदिमा यांच्या नावाने माजी संमेलनाध्यक्षांंना निधी पुढील वर्षापासून उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढील काळातही साहित्य संमेलनासाठी जे जे करणे गरजेचे आहे ते शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Hindi is not compulsory in the state: Deputy Chief Minister