महिला क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी

दोन नोव्हेंबर 2025 हा दिवस भारतीय महिला क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवला जाणार आहे. कारण यादिवशी भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत विश्व विजयाला गवसणी घालत ऐतिहासिक कामगिरी केली. या क्षणाची प्रतीक्षा 145 कोटी भारतीय गेली अनेक दशके करत होते. रविवारी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने विजय मिळवून देशवासीयांना दिवाळीची अनोखी भेट देतील, याची चाहूल शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यातच लागली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जेमिना रॉड्रिग्स हिने अविश्वसनीय खेळ करून भारताला अंतिम फेरीत पोहोचवले. अंतिम फेरीत भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी होता. भारतीय संघाने जर आपल्या क्षमतेनुसार खेळ केला तर भारतीय संघ विश्चषकावर नाव कोरेल, असा विश्वास देशवासीयांना होताच. मात्र, दक्षिण आफ्रिकेला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नव्हता. कारण साखळीत या संघाने भारताला नमवले होते. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी दिली. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी शतकी सलामी देऊन भारताला चांगली सुरुवात करून दिली. भारताची सलामीवीर शेफाली वर्माने धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या 78 चेंडूंत 87 धावा केल्या. विशेष म्हणजे, ती भारताच्या मुख्य संघात नव्हती. मात्र, प्रतिका रावल ही दुखापतग्रस्त झाल्याने तिची भारतीय संघात निवड झाली आणि तिने मिळालेल्या संधीचे सोने केले. धडाकेबाज फलंदाजीसोबतच तिने दोन बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी केली आणि सामनावीर किताब मिळवला. दीप्ती शर्मा या आणखी एका अष्टपैलू खेळाडूने अर्धशतक झळकावले आणि गोलंदाजीत पाच बळी मिळवले. स्पर्धेत 200 च्या वर धावा आणि सर्वाधिक 22 बळी या तिच्या अष्टपैलू कामगिरीची दखल घेऊन तिला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. शेफाली आणि दीप्तीला स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमिना रॉड्रिग्ज, रिचा घोष यांची चांगली साथ दिल्याने भारताने 298 धावा काढल्या. अंतिम सामन्यात या धावा पुरेशा ठरल्या. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्याने भारताने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी सहज नमवता आले.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा हिने झुंजार शतक झळकावत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण तिचे प्रयत्न अपुरे ठरले. भारताने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय महिलांची ही कामगिरी महिला क्रिकेट संघासाठी संजीवनी देणारी ठरणार आहे. कारण आपल्या देशात महिला क्रिकेटला कधीच गांभीर्याने घेतले जात नाही. याला मीडियाही अपवाद नाही. मीडिया पुरुष क्रिकेटला जितकी प्रसिद्धी देतात त्याच्या दहा टक्केही प्रसिद्धी ते महिलांच्या क्रिकेटला देत नाहीत. महिला क्रिकेट संघाच्या सामन्यांना टीव्हीवर थेटपणे दाखवले जात नाही. हा विश्वचषक असल्याने याचे थेट प्रेक्षपण केले गेले. मात्र, द्विपक्षीय मालिका टीव्हीवर दाखवल्या जात नाहीत. महिला क्रिकेट संघाला प्रायोजकही मिळत नाही. असे असतानाही महिला क्रिकेटपटू मात्र आपले काम इमानेइतबारे करून देशाचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न करतात, हेच या विश्व विजयाने दाखवून दिले आहे. याआधी भारताच्या 19 वर्षांखालील मुलींनी दोनदा विश्वचषक जिंकला आहे. मात्र, वरिष्ठ संघाला विश्वविजयाला गवसणी घालण्यात अपयश येत होते. दोनदा भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, त्या संघांना विश्वविजयाला गवसणी घालण्यात अपयश आले होते. त्यामुळे भारताच्या वरिष्ठ संघाला विजेतेपद मिळवणे शक्य नाही, अशी टीका होत होती.
साखळी फेरीतही भारतीय महिला संघाने सलग तीन सामने गमावल्यानंतर या संघावर टीका होऊ लागली. मात्र, भारताच्या महिला खेळाडूंनी या टीकेकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून अशक्य वाटणारी कामगिरी शक्य करून सवार्ंनाच चकित केले. भारतीय महिला संघाने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर अप्रतिम कामगिरी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी या संघाचे नेतृत्व कुशलतेने केले. या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी संघाला विश्वविजयी करण्यात मोलाची कामगिरी बजावली. एकूणच सांघिक कामगिरी करून भारताने हा विश्वविजय मिळवला आहे. भारताच्या महिला संघाची ही कामगिरी ऐतिहासिकच आहे.
भारताच्या या महिला खेळाडूंच्या कामगिरीचा देशातील 145 कोटी जनतेला सार्थ अभिमान आहे. महिला क्रिकेटसाठी हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. महिला क्रिकेटला ऊर्जितावस्था देणारा हा विजय आहे. पुरुष क्रिकेटमध्ये जे कपिलदेवच्या संघाने 1983 साली केले होते तेच हरमनप्रीत कौरच्या या संघाने करून दाखवले आहे. पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून भारताच्या या महिलांनी इतिहास घडवला आहे. भारताच्या या महिला खेळाडूंनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. वास्तविक भारताच्या महिला संघाने यापूर्वीदेखील देशासाठी अनेकदा अप्रतिम कामगिरी केली आहे. असे असूनही भारतीय महिला क्रिकेटला देशात गांभीर्याने घेतले जात नाही. जितकी लोकप्रियता पुरुषांच्या क्रिकेटला मिळते तितकी महिला क्रिकेटला मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. या विश्वविजेतेपदानंतर तरी देशात महिला क्रिकेटला गांभीर्याने घेतले जाईल, अशी आशा करूया. पहिल्यांदाच विश्वचषकावर भारताचे नाव कोरून इतिहास घडवणार्‍या भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन! चक दे इंडिया!! जय हो!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *