श्रीरामपथक शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम
अभोणा : प्रतिनिधी
शिवकालीन कलेतून लाठीकाठी, दांडपट्टा व तलवार या शस्त्रांच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणातून मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. शिवबांचे कट्टर मावळे तयार व्हावेत. मुलांमध्ये धैर्य, शिस्त व कर्तव्यपालनाची भावना निर्माण व्हावी, यासाठी येथील श्रीरामपथक शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या प्रदर्शनात ऐतिहासिक पुस्तके, नाणी, वस्तू व शस्त्रे जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे लोकांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसले.
मुरुड जंजिरा (जि. रायगड) येथील एसटी आगारातील कर्मचारी योगेश चौधरी यांनी आपला छंद जोपासताना पौराणिक, ऐतिहासिक व दुर्मिळ वस्तूंचा पाच वर्षांपासून ठेवा जपला आहे. त्यांच्या दोन्ही मुली लाठीकाठी चालविण्यात पारंगत आहेत. गडकिल्ल्यांची सफर करायला त्यांना आवडते. घरात असे पोषक वातावरण लाभल्याने चौधरी यांना मानसिक पाठबळ मिळाले. त्यामुळे आज त्यांच्या संग्रहात दोन हजार 100 पुस्तके आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील सुमारे सातशे पुस्तके आहेत. यात नावाजलेल्या लेखकांची पुस्तके आहेत. भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या जुन्या अंकांसह हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके संग्रही आहेत. छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवे यांच्या मोडी लिपीतील दस्तावेज व कागदपत्रे उपलब्ध आहेत.
गडकिल्ल्यांची पुस्तके, नकाशा, रंगीत पोस्टर फोटो, विविध संस्थानचे स्टॅम्पपेपर, कोर्ट तिकीट, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता जिजाऊ, शहाजीराजे यांच्यावरील पोस्ट स्टॅम्प, एफडीसी कव्हर, व्हीआयपी कव्हर, पोस्ट कार्ड, रंगीत, कृष्णधवल चित्र, शिवकालीन तांब्याची नाणी, शिवराई सोन्याचे नाणे म्हणजेच होनची प्रतिकृती उपलब्ध आहे. मौर्यकालीन जगातील सर्वांत छोटी 0.08 ते 0.15 ग्रॅम वजनाची नाणी, अहिल्याबाई होळकर यांच्या इंदोर, ग्वाल्हेर, बडोदा, धार, नागपूर संस्थानांची तांब्याची नाणी, मुघलांसह अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही यांची व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची तांब्याची नाणी, स्वतंत्र भारताचे जुने व नवे चलन, नेपाळ, अमेरिका, बांगलादेश, सिंगापूर, इराण, इराक, सौदी अरेबिया, येमेन, चीन यांची विदेशी नाणी उपलब्ध आहेत. भारतीय नोटांमध्ये व्हीआयपी, जन्मदिनांक, लग्नतिथी, वाढदिवस दर्शविणार्या नंबरच्या नोटा, जुने कुलूप, धान्य मोजण्याची पितळी मापे, छोटा वजनकाटा, वाळूची घड्याळे, जुना वरवंटा पाटा, खलबत्ता, मुसळी व मातीची भांडी संग्रहात आहेत.
प्रदर्शनात ही होती शस्त्रास्त्रे
विविध शस्त्रास्त्रांमध्ये सरळ धोप, वक्र धोप, समशेर, राजपुताना तलवार, फिरंगी तलवार, छोटी बाल कट्यार, मोठी कट्यार, बीचवा, खंजीर, वाघनखे, मराठे भाला, मुघल भाला, मराठा सैन्य निर्मित विटा, तसेच दांडपट्टा, लाठीकाठी. कुर्हाड प्रकारातील फरशी कुर्हाड, कुर्बानीसाठीची चंद्रहास कुर्हाड, सांबर शिंग म्हणजेच मडू हत्यार, तलवारीची मूठ, जुने चाकू-सुर्या, जुन्या वापरातील अडकित्ते, बोफोर्स तोफांची छोटी पितळी प्रतिकृती, युद्धातील चिलखत, बक्तर शिरस्त्राण प्रदर्शनात पाहायला मिळाले.