शहरात उत्साहात होळी सण साजरा
नाशिक : प्रतिनिधी
परंपरेनुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजर्या होणार्या होळीचा सण शहरात मोठ्या उत्साहात झाला. होळीच्या दिवशी होलिकादहन करून वाईट गोष्टींचा त्याग व चांगल्या विचारांचे स्वागत करत नव्या सुरुवातीचा संदेश देण्यात आला.
होळी रे होळी, पुरणाची पोळी असा जल्लोष करत नागरिकांनी सण साजरा केला. संध्याकाळी ठिकठिकाणी होळ्या पेटविण्यात आल्या होत्या. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला, तसेच श्रीफळाची आहुती देण्यात आली. होळीत भाजलेल्या खोबर्याचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची पारंपरिक प्रथाही अनेक ठिकाणी पाळण्यात आली.
शहरातील विविध संस्था, संघटना, सोसायट्यांतील नागरिकांनी एकत्र येत सार्वजनिक होळी साजरी केली. यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
आज, मंगळवारी (दि. 3) धुळवड असून, काही नागरिक होळीची राख अंगाला लावून धुळवड साजरी करतात. नाशिकमध्ये परंपरेनुसार रंगपंचमीला रंगांचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणून होळीला विशेष महत्त्व असते. आनंद व एकोप्याचा संदेश देणारा हा सण उत्साहात साजरा करण्यात
आला.
Holi, Holi, the feast of Puranas..!