अमली पदार्थविरोधी पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचा सन्मान प्रशंसापत्र देऊन केला.
नोव्हेंबर 2023 ते 16 मे 2025 या कालावधीत अमली पदार्थ तस्करीविरोधात केलेल्या कारवायांमध्ये एमडी, गांजा, चरस, तिकीट यांसारख्या पदार्थांवर कठोर कारवाई करत एकूण 731.04 ग्रॅम एमडी, 292 किलो 17 ग्रॅम गांजा, 49 ग्रॅम चरस आणि 326 किलो 972 ग्रॅम ‘तिकीट’ जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 83 लाख 70 हजार रुपये आहे. याप्रकरणी एकूण 129 आरोपींवर कारवाई करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, परिमंडळ-2 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, तसेच इतर अधिकारी आणि अंमलदार यांचा मोलाचा वाटा राहिला. श्वान पथकाचे हवालदार विलास पवार, गणेश कोंडे, संतोष ससाणे व अमली पदार्थ शोधक श्वान ‘मॅक्स’ याचाही उपयोग झाला. गुरुवारी (दि. 22) पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित समारंभात पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या हस्ते सर्व अधिकार्‍यांना गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *