चार महिन्यांत सातशे कोटी वसुलीचे मनपाला आव्हान
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील करदात्यांकडील थकबाकीचा आकडा तब्बल 920 कोटींवर पोहोचला आहे. या थकबाकीत चालू मागणी सहाशे कोटी व शास्तीची 387 कोटी, असे मिळून हा आकडा नऊशे कोटींच्या घरात गेला आहे. चालू आर्थिक वर्षातील वसुली दोनशे कोटींपर्यर्ंत गेली असून, उर्वरित सव्वासातशे कोटींच्या थकबाकीचा डोंगर कसा पार करायचा, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.
घरपट्टीद्वारे वसूल होणार्या रकमेतून महापालिका विविध विकासकामे करत असते. त्यामुळे महापालिकेसाठी उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. दरम्यान, घरपट्टी वसुली अत्यंत कासवगतीने होत असल्याने त्याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. अभय योजनेत अवघी 75 कोटींची वसुली झाली. अभय योजनेद्वारे किमान शंभर कोटींची वसुली होण्याचे उद्दिष्ट होते; परंतु 75 कोटींवरच शास्तीची थकबाकी रखडल्याने पुढील चार महिन्यांत 725 कोटी वसुलीचे शिवधनुष्य पेलायचे आहे. एवढी मोठी रक्कम कर विभाग कशी वसूल करणार, हे पाहावे लागणार आहे.
शहरात घरपट्टीधारकांची संख्या पाच लाख 13 हजारांच्या घरात आहे. चालू घरपट्टीची मागणी तीनशे कोटींच्या घरात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता महापालिकेला 25 टक्के हिश्श्याची रक्कम जमा करायची आहे. चारशे कोटींचे बॉण्ड उभारले आहेत. उर्वरित रकमेसाठी कर विभागाकडून जास्तीत जास्त वसुलीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
निवडणुकीमुळे वसुलीला अडथळे
महापालिकेच्या कर विभागाच्या हाती नवीन आर्थिक वर्ष लागण्यापूर्वी चार महिन्यांचा कालावधी आहे. मात्र, महापालिका निवडणूक येत्या एक-दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्याकरिता निवडणुकीच्या कामकाजासाठी कर विभागातील अधिकार्यांसह कर्मचार्यांनाही कामाला लावल्याने थकबाकी वसुलीला ब्रेक लागणार आहे. परिणामी, 2025-26 या आर्थिक वर्षातील थकबाकीचा डोंगर कमालीचा वाढणार आहे.
गतवर्षापेक्षा 15 कोटींची अधिक वसुली
गेल्या वर्षी 2024-25 च्या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान 180 कोटींची वसुली झाली होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात 195 कोटींचा भरणा करदात्यांनी केला. ही रक्कम मागील वर्षापेक्षा 15 कोटींनी अधिक आहे.