रोखणार कशी गर्दी?

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सध्या वेग आला आहे. शहरात रस्ते, पूल, घाट, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांची उभारणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, या सर्व तयारीबरोबरच प्रशासनासमोर उभे राहणारे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे गर्दी व्यवस्थापन. अलीकडे झालेल्या विश्व मराठी संमेलनाच्या काही कार्यक्रमांदरम्यान झालेल्या गर्दीच्या अनुभवामुळे या प्रश्नावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणात भाविक एकाच वेळी घाटांवर जमा झाल्यास त्याचे योग्य नियोजन नसेल तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पायाभूत सुविधांबरोबरच प्रभावी गर्दी नियंत्रण ही प्रशासनासाठी महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे.

विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी आयोजित फोक अख्यान या कार्यक्रमावेळी प्रचंड गर्दी उसळली होती. संमेलनादरम्यानही काही कार्यक्रमांत प्रचंड गर्दी झाली होती. शिकायला गेले एक या नाटकावेळी महाकवी कालिदास कलामंदिराच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षक आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर समारोपाच्या दिवशी झालेल्या फोक अख्यान कार्यक्रमावेळी गर्दीचा रेटा एवढा वाढला की, संमेलनस्थळी जाणारे काही मार्ग बंद करावे लागले. तसेच संपूर्ण शहरातील पोलीस फौजफाटा तेथे तैनात करण्यात आला होता. या अनुभवामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळातील संभाव्य परिस्थितीची झलक प्रशासनाला पाहायला मिळाली. ही गर्दी कुंभमेळ्यातील संभाव्य गर्दीच्या तुलनेत अत्यंत कमी असली, तरी तिचे व्यवस्थापन करताना प्रशासनाची अक्षरशः दमछाक झाल्याचे दिसले.
कुंभमेळ्यासाठी सुमारे पाच कोटी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या वेळी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे अचानक मोठी गर्दी झाल्यास तिचे प्रभावी व्यवस्थापन करणे, हे प्रशासनासमोरील सर्वांत मोठे आव्हान ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतिहासातही कुंभमेळ्याशी संबंधित काही धडे मिळाले आहेत. 2015 चा कुंभमेळा तुलनेने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि कोणतीही मोठी दुर्घटना न होता पार पडला होता. मात्र, 2003 च्या कुंभमेळ्यात नाशिकमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची घटना आजही स्मरणात आहे. त्या घटनेने गर्दी व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले होते.
नाशिकमधील गोदाघाट परिसर आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसर हे तुलनेने अरुंद असल्यामुळे येथे गर्दीचे व्यवस्थापन करणे अधिक कठीण ठरते. ही पाश्वर्र्भूमी लक्षात घेत प्रशासनाकडूनही विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गर्दी व्यवस्थापनाची लिटमस टेस्ट घेण्यात येत आहे. गोदाघाटावरील आरती, विश्व मराठी संमेलन, संत निवृत्तिनाथ यात्रा, एअर शो या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशासनाकडून कुंभमेळा गर्दी व्यवस्थापनासाठी धडे घेतले जात आहेत.
दरम्यान, गोदाघाटावर झालेल्या गोदा आरतीच्या दिवशी लगतच्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वाहनधारकांना कोंडीत अडकून राहावे लागले होते. शहरातील कार्यक्रमांत होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये एकाच वेळी दाखल झाल्यास परिस्थिती अधिक जटिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या कुंभमेळ्याच्या नियोजनात या सर्व अनुभवांचा आणि वाढत्या भाविक संख्येचा विचार करणे अत्यावश्यक ठरणार आहे. यासाठी शासनाने विशेष कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली असून, त्यामार्फत संपूर्ण कुंभमेळ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. यंदा गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. प्रशासनाने स्मार्ट गर्दी व्यवस्थापन योजना आखली आहे. यात एआयआधारित प्रणाली, ड्रोनद्वारे रिअल टाइम मॉनिटरिंग, सीसीटीव्ही नेटवर्क, बाह्य वाहनतळ, कायमस्वरूपी होल्डिंग एरिया आणि विशेष मोबाइल अ‍ॅप्सचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढल्यास त्याची त्वरित माहिती मिळून आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे यश केवळ धार्मिक कार्यक्रमांवर अवलंबून नसून त्यामागे असलेल्या व्यवस्थापन क्षमतेवरही अवलंबून आहे. पायाभूत सुविधा, सुरक्षा, वाहतूक व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रभावी गर्दी व्यवस्थापन. यात योग्य समन्वय साधला गेला तरच हा भव्य सोहळा सुरक्षित आणि यशस्वीपणे पार पडू शकतो. त्यामुळे यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन हेच प्रशासनासमोरील सर्वांत मोठे आव्हान आणि तितकीच मोठी जबाबदारी ठरणार आहे.

How to stop the crowd?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *