पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

वरुणराजा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मात्र, पावसाचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणातील दमटपणा, थोडाफार गारवा आणि अंगावर ओले कपडे जास्त वेळ राहून देणे, यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. पावसाळ्यात विविध डासांचा प्रसार होतो. त्यामुळे पावसाळ्यात दवाखाने नेहमी हाऊसफुल्ल झाल्याचे आपण पाहतो. पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी स्वच्छता आणि त्यासोबत विविध बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यातील आजार
हिवताप, मलेरिया ः पावसाळ्यात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. अनॉफिलिस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण होते.
सर्दी, खोकला ः अंगावर ओले कपडे जास्त वेळ, पावसात भिजणे यामुळे सर्दी- खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात.
दमा ः ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणार्‍या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो.
जुलाब ः पावसाळ्यात पाण्याचे प्रदूषण जास्त होते. त्यामुळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
पायाला चिखल्या होणे ः पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.
उपाययोजना आणि प्रतिबंध
पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलणे गरजेचे आहे.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे. घरात किंवा परिसरात स्वच्छता ठेवणे. डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करणे.
स्वच्छ किंवा उष्ण पाणी पिणे.
पावसात भिजणे टाळावे.
आजाराची लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे
आहारविषयक काळजी
पावसाळ्यात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्टफूड, उपवासासाठी शेंगदाणे किंवा भगर हे पदार्थ खाणे टाळावे. पचायला हलके आणि उष्ण पदार्थ शक्यतो घ्यावे. यात बेसन लाडू, टोमॅटो सूप, वांगी, भेंडी, कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे या पदार्थांचा वापर करावा.
आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाय
स्वच्छता राखा : पावसाळ्यात जंतू आणि किटाणू लवकर पसरतात. त्यामुळे  वारंवार हात धुणे, स्वच्छ कपडे घालणे आणि आसपासची जागा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
पाणी उकळून प्या : पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी उकळून पिणे आरोग्यासाठी
उत्तम आहे.
ताजा आणि पौष्टिक आहार घ्या : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताज्या भाज्या आणि फळे खा. शिळे अन्न खाणे टाळा.
मच्छरांपासून बचाव करा : पावसाळ्यात डासांची पैदास वाढते. त्यामुळे मच्छरदाणीचा वापर करा आणि घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका.
सर्दी-खोकला झाल्यास ः गरम पाणी प्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधोपचार करू नका.
पावसात भिजणे टाळा : पावसात भिजल्यास लगेच घरी जाऊन गरम पाण्याने स्नान करा.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवा : पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. त्यामुळे लिंबू, आले, मध व तुळस यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा आहारात समावेश करा.
पुरेशी झोप घ्या : दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *