एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन
नाशिक :- एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लिट-फेस्ट (लिटरेचर फेस्टिव्हल-साहित्य उत्सव) च्या माध्यमातून इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन संगीत, गायन नृत्य आणि नाटकांच्या माध्यमातून घडविले. ‘गुरुदक्षिणा’तील पलाश हॉलमध्ये बुधवारी हा कार्यक्रम पार पडला.
इंग्रजी विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेला हा दहावा लिटफेस्ट होता. यामध्ये हर्षवर्धन वैद्य आणि त्याच्या टीमने ‘मॅलेफिसियंट’ नाटकातील एक भाग सादर केला, तर भक्ती सोनवणे आणि तिच्या टीमने ‘इन द लाईफ ऑफ ऑथर’ या नाटकातील एक भाग सादर केला. जान्हवी आणि तिच्या टीमने समूह नृत्य (सालसा, बॉसरुम, हिप-हॉप) सादर केले. अनुश्री देशमुख हिच्या टीमने ‘लेट मी लव्ह यू’ हे समूहगीत सादर केले. श्रध्दा पगारे आणि अंजली सिंग यांनी टेल ऑफ ट्युन्स–अ डिझ्नी मुझिकल हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. या लिट-फेस्टच्या समन्वयक म्हणून डॉ. सुनीता मेनॉन यांनी काम पाहिले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आनंदा खलाणे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रणव रत्नपारखी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विद्या पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. गोरख जोंधळे, प्रा. शंकर भोईर, प्रा. अपर्णा कुलकर्णी, प्रा. स्वरुपा जोशी, प्रा. निम्मी कुरियन यांनी परिश्रम घेतले. हर्षवर्धन वैद्य, भक्ती सोनवणे आणि अनुश्री देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.