गावभर लागल्या रांगा; सिंहस्थ कुंभमेळ्यात काय होणार?
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली आहे. दर्शनासाठी गावभर रांगा लागल्या असून, दर्शनार्थींचे होणारे प्रदर्शन येथील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे. शनिवार, रविवार यांना जोडून सोमवारी आलेली प्रजासत्ताक दिनाची सुट्टी यामुळे भाविक, पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या गर्दीने दर्शनासह सर्व व्यवस्था कोलमडली आहे. दर्शनाबाबत तर अगदीच अनागोंदी निर्माण झालेली पहावयास मिळत आहे. संत निवृत्तिनाथ यात्रोत्सवाकडे सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून पाहणार्या प्रशासनाला सुट्टीच्या कालावधीत होणार्या गर्दीचा विसर पडला आहे. कालची ही परिस्थिती पाहता सिंहस्थ कुंभमेळ्यात काय होणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. कुंभमेळ्याच्या नावाने नियोजनाचे गुर्हाळ अद्याप सुरू आहे. तशात चार दिवसांची सुट्टी आली तर शहरात पायी चालायला जागा शिल्लक नसते, अत्यवस्थ असलेल्या रुग्णालयाला उपचारासाठी गावाबाहेर घेऊन जाणे शक्य होत नाही, अशी बिकट स्थिती निर्माण होत आहे.
त्र्यंबकेश्वर येथे पन्नास हजारांच्या दरम्यान भाविक आले व त्यांनी दर्शनासाठी आग्रह धरला तर काय घडेल, याचे प्रात्यक्षिक या तीन दिवसांत घडते आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट यांनी थेट दर्शनाच्या नावाने बाजार मांडला आहे व त्याचे थेट प्रदर्शन गावभर होत आहे. मंदिरात 200 रुपये घेऊन थेट दर्शन घडवण्याचा दावा ट्रस्ट प्रशासन करत आहे. त्यासाठी दररोज 7 हजार भाविकांना दर्शन देण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये दोन हजार पास ऑनलाइन आणि पाच हजार पास तिकीट खिडकीवर उपलब्ध होतात. भाविकांनी तिकीट घेतले अथवा नाही घेतले तरीही त्याला दर्शनासाठी सारखाच वेळ लागतो. तो साधारणतः 8 ते 9 तासांच्या दरम्यान आहे.देवस्थान ट्रस्टने गर्दीच्या कालावधीत पेड दर्शन बंद ठेवणे गरजेचे आहे. मात्र, त्यामधून मिळणार्या लाखो रुपये उत्पन्नाचा मोह
सुटत नाही.
यासाठी वाहनतळ, शिवप्रसाद इमारत आणि कुशावर्त या तीन ठिकाणी तिकीट खिडकी आहे. रविवारी सकाळपासून येथ तिकीट घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. वाहनतळ येथील रांग थेट जव्हार फाटा येथे, शिवप्रसाद इमारत येथील रांग तहसील कार्यालयाच्या पुढे तर कुशावर्ताची रांग पाठीमागच्या बाजूने संत निवृत्तिनाथ मंदिराकडे पोहोचली होती. तेथून तिकीट घेऊन पुन्हा मंदिराच्या 200 रुपये दर्शनबारीत काही किलोमीटर अंतरापर्यंत भाविक उभे राहिले. यासोबत पूर्व दरवाजा मोफत दर्शनबारी गोदावरी नदी ओलांडून अहिल्या नदीच्या बाजूने थेट ब्रह्मगिरीच्या पायथ्याकडे पोहोचली.
चालण्यासदेखील जागा शिल्लक नसते
रात्री 11 वाजेनंतर मंदिराच्या बाहेर पडलेल्या भाविकाला हॉटेल बंद झाल्याने जेवण अथवा खाद्यपदार्थ मिळत नाहीत. सायंकाळच्या सुमारास जेवण न करता दर्शनबारीत थांबलेले भाविक रात्री बाहेर येतात तेव्हा बस नसतात. मुक्कामासाठी लॉजमध्ये रूम शिल्लक नसतात. इतकेच नव्हे तर खाण्यासाठी काही मिळत नाही, अशी भीषण परिस्थिती येथे अनुभवास येत आहे. तिकीट घेण्यासाठी गावभर पळावे लागते व त्यानंतर दर्शनासाठी पुन्हा काही किलोमीटर रांगेचे शेवटचे टोक गाठावे लागते. यामध्ये लहान मुले, वयोवृद्ध यांचे हाल बेहाल आहेत. मंदिराच्या समोर भाविक दर्शनाच्या आशेने गर्दी करतात. येथे पायी चालण्यासदेखील जागा शिल्लक नसते. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी राहतात. सर्वत्र असलेली अस्वच्छता यांसह विविध कारणांनी या गावात नगरपरिषद, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, पोलीस आणि तहसील या यंत्रणा नेमके कोणते काम करतात? असा प्रश्न येथे आलेले भाविक उपस्थित करत आहेत.
Huge crowd gathers to see Trimbak Raja