कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

पंचवटी : प्रतिनिधी
कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक स्वामी महोत्सव सुरू झाला आहे. चार दिवस चालणार्‍या या महोत्सवात कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. कार्तिक पौर्णिमेला हा महोत्सव प्रारंभ होऊन तो कार्तिक नक्षत्रापर्यंत सुरू राहणार आहे. या मुहूर्तावर दर्शन घेत भाविक मोरपीस कार्तिक स्वामींच्या चरणी अर्पण करीत आहेत. काही भाविक येथे अभिषेक करत आहेत.
काशी नाट्टूकोटाई नगर छत्रम मॅनेजमेंट सोसायटीतर्फे मंगळवारी (दि. 4) रोजी रात्री दहा वाजून 37 मिनिटांनी कार्तिक पौर्णिमेस प्रारंभ होताच पूजा व अभिषेक केला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्री तसेच बुधवारी सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. बुधवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजून 49 मिनिटांपर्यंत पौर्णिमा असल्याने या वेळेत गर्दी वाढली होती. गुरुवारी (दि. 6) रोजी सकाळी सहा वाजून 34 मिनिटांपासून कार्तिक नक्षत्रास प्रारंभ होईल. ते शुक्रवार(दि.7)पर्यंत राहणार असल्याने या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तसेच बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शन सुलभ होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात
आला आहे.
या महोत्सवात कार्तिक स्वामींना मोरपीस अर्पण करण्याची परंपरा असल्याने मंदिराच्या आवारात मोरपिसांसह प्रसाद, खेळणी, पूजा साहित्य आदींची दुकाने थाटण्यात आली आहेत. भाविकांकडून मोरपिसांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. अर्पण केलेली काही मोरपिसे भाविक घरी घेऊन जात असल्याने परिसरात बहुतेकांच्या हाती मोरपीस दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *