विषय पुकारताच गोंधळाला सुरुवात; ठराव मंजूर-नामंजूरचे दावे
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ करण्याच्या ठरावामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘मविप्र’ समाज संस्थेच्या वार्षिक सभेत काल (दि. 14) विद्यापीठ स्थापन करण्याच्या ठरावावरून प्रचंड गदारोळ झाला. सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी हा विषय पुकारताच घोषणाबाजी सुरू झाली. त्याचवेळी अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी राष्ट्रगीत सुरू केले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एक गट ठराव मंजूर, तर दुसरा गट ठराव नामंजूर, अशा घोषणा देत होता. विद्यापीठाचा ठराव नामंजूर झाल्याचा दावा अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी केला, तर सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी मात्र आवाजी मतदानाने विद्यापीठाचा ठराव मंजूर झाल्याचे म्हटले आहे. या दाव्या-प्रतिदाव्याने सभासदांतही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची 111 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (रविवार) मविप्रच्या आवारातील रौंदळ सभागृहात दुपारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनील ढिकले होते. व्यासपीठावर सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, डी. बी. मोगल, दिलीप दळवी, विश्वास मोरे, संदीप गुळवे, रवींद्र देवरे, डॉ. सयाजीराव गाायकवाड, प्रवीण जाधव, लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, अमित बोरसे, प्रसाद सोनवणे, रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, रमेश पिंगळे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी संस्थेने गेल्या वर्षभरात केलेल्या कामांची माहिती देताना प्रारंभीच हे विद्यापीठ झालेच पाहिजे, असा कोणताही अट्टहास नाही. हे सांगताना यासंदर्भात आम्ही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनाही आपण सभासदांच्या हिताचा निर्णय घेऊ, असे सांगितले. यावर शरद पवार यांनीही सभासदांच्या भावनांची कदर करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगितले. आज संस्थेच्या पाचशे दहा शाखा झाल्याचे ठाकरे म्हणाले. आडगाव येथील डॉ. वसंत पवार रुग्णालयात विविध प्रकारच्या सुधारणा केल्याचे ते म्हणाले. हे प्रास्ताविक सुरू असतानाच ठाकरे यांनी विद्यापीठाचा ठराव मांडण्याची घोषणा करताच अध्यक्ष ढिकले यांनी हरकत घेत, पहिले एक ते सात विषय मंजूर करून घ्या; नंतर विद्यापीठाचा विषय घ्या, असे सांगितल्याने नंतर विषय क्रमांक एक ते सात मंजूर करण्यात आले. विद्यापीठाचा विषय क्रमांक आठ नितीन ठाकरे यांनी पुकारताच अध्यक्ष सुनील ढिकले यांनी लगेच माइकचा ताबा घेत या विषयावर कोणतीही चर्चा सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रगीत सुरू केले. एकीकडे राष्ट्रगीत सुरू असताना दुसरीकडे सभासद घोषणाबाजी करीत होते. व्यासपीठावरही विरोधकांनी धाव घेत घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूंनी ठराव मंजूर-नामंजूरच्या घोषणा सुरू झाल्या. अनेक सभासद तसेच माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनीही स्टेजवर जात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानंतर ‘मविप्र’च्या सत्ताधारी पदाधिकार्यांनी रौंदळ सभागृहाच्या बाहेर पुन्हा सभा घेतली. सभा संपूनही संस्थेच्या आवारात मोठ्या प्रमाणात सभासद थांबून होते. त्यानंतर आवारात घेतलेल्या सभेत अॅड. ठाकरे यांनी विद्यापीठाची गरज यावर सभासदांपुढे बाजू मांडली. तसेच विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने व दडपशाही केल्याचा आरोप केला.
विद्यापीठाचा ठराव मंजूर : अॅड. नितीन ठाकरे
विषय पुकारताच गोंधळाला सुरुवात झाली. या गोंधळातच अनेक सभासदांनी विद्यापीठ झालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे विद्यापीठाचा ठराव मंजूर झाल्याचा दावा संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केला. ठाकरे यांनी विद्यापीठ का गरजेचे आहे याविषयी भूमिका मांडताना विद्यापीठ झाल्यामुळे सभासदांचा हक्क हिरावला जाईल, असा खोटा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. 511 सभासदांनी हरकत घेतल्याचा विरोधकांचा दावाही त्यांनी खोडून काढला. संस्थेचे साडेदहा हजार सभासद आहेत. त्यामुळे केवळ पाचशे लोकांनी विरोध केला म्हणून हे विद्यापीठ नामंजूर होणार नाही. साडेनऊ हजार सभासदांची इच्छा हे विद्यापीठ व्हावे, अशी इच्छा आहे. आमच्या काळात संस्था कर्जमुक्त होत आहे. नीलिमाताई पवार यांनी संस्थेचा टीडीआर विकला. आम्ही संस्थेसाठी जमिनी खरेदी केल्या. शिवाय, जी जागा विद्यापीठासाठी देत आहोत, ती आमच्या बापजाद्यांची आहे आणि ढिकलेंचे संस्थेसाठी योगदान काय? असा सवालही त्यांनी केला. शरद पवार यांच्याकडे या विरोधकांनी खोटी माहिती दिली. त्यानंतर आम्ही भेटल्यावर पवार यांना वस्तुस्थिती सांगितल्यावर पवारसाहेबही आश्चर्यचकित झाल्याचे ठाकरे म्हणाले. विद्यापीठाबाबत सभासदांना आपले मत मांडायचे होते. मात्र, अध्यक्ष ढिकले यांनी मी विषय मांडताच गोंधळ घालून सभासदांना आपले मत मांडूच दिले नाही. ही एक प्रकारची दडपशाही झाली, असे ठाकरे म्हणाले.
अध्यक्ष ढिकले म्हणतात, ठराव नामंजूर
मविप्र विद्यापीठाचा ठराव मांडण्यात आल्यानंतर सभासदांनी गोंधळ सुरू केला. या गोंधळातच राष्ट्रगीताला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नेमका ठराव मंजूर झाला की नामंजूर झाला, असा संभ्रम निर्माण झाल्यानंतर अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी मात्र या ठरावाला सभासदांनी विरोध केल्यामुळे तो नामंजूर झाल्याचा दावा अध्यक्ष ढिकले यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला. ठराव पुकारताच कोणतीही चर्चा झाली नाही. लगेच राष्ट्रगीत सुरू झाले. त्यामुळे हा ठराव सभासदांनी फेटाळल्याचा दावा डॉ. ढिकले यांनी केला.
प्रचंड पोलीस फौजफाटा
गेल्या काही दिवसांपासून मविप्रच्या विद्यापीठाच्या मुद्यावरून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे विरोधाचे, तसेच समर्थनाचे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यामुळे कालच्या सभेला सभासदांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. रौंदळ सभागृह खचाखच भरून वाहत असताना जागा नसल्यामुळे अनेक सभासद सभागृहाच्या बाहेर उभे होते. सभेत गदारोळ होण्याबरोबरच काही अप्रिय घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. राज्य राखीव पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. खासगी सुरक्षारक्षकही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.
न्या. संदीप शिंदेंकडून अहवाल घेणार
मविप्र विद्यापीठाबाबत न्या. संदीप शिंदे समितीकडे सर्व माहिती देणार असून, त्यांना आपण विनंती करणार आहोत. विद्यापीठाचे फायदे-तोटे याबाबत त्यांच्याकडून अहवाल तयार करून घेऊन आपण शरद पवार यांची भेट घेणार आहोत, असे अॅड. नितीन ठाकरे म्हणाले.
‘मविप्र’ रुग्णालयाबाबत सभासदांच्या तक्रारी
सभेत मविप्रच्या आडगाव येथील डॉ. वसंत पवार रुग्णालयाबाबत एका सभासदाने अनेक तक्रारी केल्या. येथील साफसफाईकडे लक्ष दिले जात नाही. व्हेंटिलेटर बंद असून, रुग्णांना ड्रेस दिला जात नाही, अशा तक्रारी या सभेत एका सभासदाने केल्या.
सभेत बंदूकधारी
‘मविप्र’च्या वार्षिक सभेत जोरदार राडा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक व्यासपीठावर एकत्र आले. विद्यापीठाच्या विरोधात आणि बाजूने अशा घोषणा सुरू झाल्या. यावेळी वनसगाव येथील एका कार्यकर्त्याच्या कमरेला बंदूक असल्याचे उघड झाले.
विद्यापीठ होणारच
मविप्र विद्यापीठामुळे सभासदांच्या हक्कावर कोणतीच गदा येणार नाही. संस्था जशी एखादी शाखा सुरू करते, त्याच धर्तीवर हे विद्यापीठ असणार आहे. सभासदांच्या पाल्यांचेच हित यामुळे साधले जाणार असल्याने मविप्र ही आपली आई आहे आणि सभासदांच्या प्रत्येक पाल्याला या विद्यापीठाच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे हे विद्यापीठ होणारच आणि सभासदांचाही त्याला पाठिंबा असेल, असे अॅड. ठाकरे म्हणाले.
अध्यक्ष ढिकलेंवर अविश्वास आणा
मविप्र विद्यापीठ सभासदांच्या फायद्याचे कसे होईल, याविषयी वार्षिक सभेत सर्व सभासदांना माहिती द्यावी, असे आवाहन अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी केले होते. मात्र, प्रत्यक्षात नितीन ठाकरे यांना बोलण्यास वेळ न देता विद्यापीठाच्या विषयाला बगल देत त्यांच्या समर्थकांनी लागलीच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र, सभासदांनी मविप्र विद्यापीठ प्रस्तावास मंजुरी देत अध्यक्षांवर अविश्वास आणावा, अशी विनंती केली.
व्यासपीठावरच धक्काबुक्की
विद्यापीठ स्थापनेच्या मुद्यावरून बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. थेट व्यासपीठावरच धक्काबुक्की आणि माइक ओढाओढी सुरू झाली. काहींनी अॅड. ठाकरे यांना उचलून घेतले, तर अध्यक्ष डॉ. ढिकले थेट डाएसवर उभे राहिले. त्यानंतर मोठा राडा सुरू झाल्याने गोंधळातच ही सभा उरकती घेतली.
नीलिमाताई पवार, ढिकले, कोल्हेंवर टीका
अॅड. नितीन ठाकरे यांनी यावेळी माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. संजीवनी, के. के. वाघ या संस्थांना मदत होण्यासाठीच मविप्र विद्यापीठाला विरोध चालविला आहे. मुळात डॉ. वसंत पवार यांच्या निधनानंतर नीलिमाताई पवार या घटनेच्या कोणत्या कलमाने सरचिटणीस झाल्या? दडपशाही आणि दबाव निर्माण करून त्या सरचिटणीस झाल्या होत्या, असे ठाकरे म्हणाले. तसेच ज्यांच्या सभासदत्वाला विरोध केला ते कोल्हेच आज पवारांकडे गेले. कोल्हे आणि पवार ही अभद्र युती असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
सत्ताधारी-विरोधक पवारांच्या दरबारी
‘मविप्र’ विद्यापीठाचा वाद; परस्पर दावे
नाशिक : प्रतिनिधी
मविप्र विद्यापीठाचा वाद थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला आहे. नाशिक दौर्यावर आलेले शरद पवार यांची विरोधी गटाचे डॉ. सुनील ढिकले, तसेच काही माजी पदाधिकार्यांनी भेट घेऊन मविप्र विद्यापीठाच्या विरोधाची भूमिका मांडल्यानंतर लागलीच मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन बाजू मांडली. पवार यांनी दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतली.
या भेटीसंदर्भात सरचिटणीस ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट टाकून माहिती दिली. त्यात म्हटले की, मविप्र समाजाबद्दल मनात नेहमीच जिव्हाळा असणारे आमचे मार्गदर्शक व आदरणीय शरद पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. मविप्र विद्यापीठासंदर्भात त्यांच्याशी सखोल चर्चा करून त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संस्थेचे विद्यापीठनिर्मिती ही काळाची गरज आहे. अशा प्रकारचे स्पष्टीकरण देऊन यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. सुनील ढिकले यांनीदेखील नितीन ठाकरे यांच्या अगोदर शरद पवार यांची भेट घेऊन विद्यापीठाबाबत भूमिका मांडली.त्यावेळी स्वतंत्र विद्यापीठाला माझी पसंती नाही, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा दावा ढिकलेंनी केला. मात्र, नितीन ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर शरद पवार यांचे विद्यापीठाच्या बाजूने मत असल्याचे सांगितले. दोन्ही गटांनी पवारांची भेट घेऊन वेगवेगळे दावे केल्याने सभासदांमध्ये गोंधळ व संभ्रम निर्माण झाला आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…