वंचित दोनशे शेतकर्यांचा इशारा; कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही
कंधाणे : वार्ताहर
कंधाणे येथील खरीप व रब्बी 2024 हंगामातील नुकसानग्रस्त शेतकर्यांनी नुकसानीची तक्रार दाखल केली असताना, कंपनीच्या अधिकार्यांनी संबंधित नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पीक पंचनामा न केल्याने 200 शेतकरी हक्काच्या पीकविमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत. यावर तात्काळ कारवाई न झाल्यास सोमवार(दि. 25)पासून तलाठी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संबंधित शेतकर्यांनी दिला आहे. याबाबत निवेदन नाशिक विभागीय आयुक्तांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गावातील दोनशेहून अधिक शेतकर्यांनी खरीप व रब्बी 2024 मधील नुकसानीची तक्रार ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर 72 तासांच्या आत नोंदवली होती. त्याबाबतचा तक्रार क्रमांकही शेतकर्यांकडे उपलब्ध असून, पीकविमा कंपनीने गावातील मोजक्याच शेतकर्यांचे सर्वेक्षण करून त्यांना पीकविमा मंजूर केला. मात्र, 72 तासांच्या आत तक्रार नोंद दिलेल्या शेतकर्यांच्या तक्रारीची कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून कोणतीही दखल घेतली नाही.
या शेतकर्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले नसल्यामुळे त्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे येत्या आठ दिवसांत नुकसानग्रस्त शेतकर्यांना पीकविमा कंपनीने पीकविमा रक्कम न दिल्यास कृषी विभाग व पीकविमा कंपनीविरोधात सोमवारपासून कंधाणे येथील तलाठी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वंचित शेतकर्यांनी दिला आहे.
या शेतकर्यांच्या जीविताची सर्वस्वी जबाबदारी इन्शुरन्स फायनान्स कंपनीची राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर शेतकरी बाळासाहेब बिरारी, किरण पाटील, दिलीप बिरारी, मनोहर बिरारी, कारभारी बिरारी, भाऊसाहेब बिरारी, सुभाष बिरारी, भाऊराव बिरारी, बाळू बिरारी, गिरीधर बिरारी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
खरीप हंगामात परतीच्या पावसाने व रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने कांदा पिकाचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या क्षेत्रातील पिकाची तक्रार 72 तासांच्या आत कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदवली होती. पण कंपनीने त्यांच्या प्रतिनिधींमार्फत नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामा न केल्याने आम्ही पीकविमा रकमेपासून वंचित राहिलो आहोत. आठ दिवसांत पीकविमा रक्कम न दिल्यास उपोषणास बसणार आहोत.
– बाळासाहेब बिरारी, माजी संचालक, ‘वसाका’