इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी शहरातील सुधानगर येथील पती पत्नीने रेल्वे खाली आत्महत्या केल्याची भीषण घटना उघकीस आली आहे. बुधवार दि. ६ रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही दुदैवी घटना घडली असून आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी नाशिकहुन इगतपुरीकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेखाली दिनेश देविदास सावंत, वय ३८ वर्ष, विशाखा दिनेश सावंत, वय ३३ वर्ष यांनी उडी घेऊन या पती पत्नीने आपले संपवले. या बाबतची खबर देविदास देवाजी सावंत यांनी घोटी पोलिसांना दिली असुन पोलीसांनी पंचनामा करीत घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे. या दुर्दैवी धक्कादायक घटनेने इगतपुरी तालुक्यासह घोटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.