पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

                                                 चेतन नाना माडकर

 

                                                      स्वाती चेतन माडकर

चुंचाळेतील घटना, तीन मुलांचे छत्र हरपले

सिडको : विशेष प्रतिनिधी
घरगुती वाद विकोपाला गेल्याने पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वत:नेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चुंचाळे परिसरात घडली. या दुर्दैवी घटनेने तीन चिमुकली मुले मात्र अनाथ झाली आहेत.
अंबड येथील खालच्या चुंचाळे परिसरातील हनुमान मंदिराजवळील मनपा शाळेमागील भागातील एका दहा बाय दहाच्या लहानशा भाड्याच्या घरात चेतन नाना माडकर (वय 33) व पत्नी स्वाती चेतन माडकर (वय 27) राहत होते. त्यांना तीन मुले असून, घटनेच्या वेळी मुलगा आणि मुलगीच घरातच होती. मधला मुलगा घरामागील आजीच्या घरी असताना सोमवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चेतनने पत्नी स्वातीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर घरातील छताच्या अँगलला गळफास घेऊन त्यानेही जीवन संपवले.
चेतन हा पंचवटीतील फुलेनगर परिसरात राहत होता. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. नवरा -बायकोमध्ये सतत होणार्‍या भांडणामुळे स्वाती ही फुलेनगर येथील चेतनचे घर सोडून चुंचाळे येथे आईसमवेत राहत होती. मात्र यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वीच मिटल्यामुळे ती देखिल काही दिवसांपासून स्वतंत्र खोली घेऊन चेतन बरोबर राहत होती. दोन दिवसांपूर्वी देखिल नवरा बायकोमध्ये वाद झाले होते. स्वाती घराजवळच एका खासगी कंपनीत काम करून तीन मुलांचा सांभाळ करत होती. मात्र सोमवारी मध्यरात्री दारूच्या नशेत हा अनर्थ घडला असल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निरपराध मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत असून, आई-वडिलांच्या सावलीशिवाय ते कसे वाढणार हा प्रश्न सर्वांनाच छळतोय. दरम्यान, चेतनवर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या पथकाच्या माध्यमातून सुरु आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *