सटाणा : प्रतिनिधी
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट सुरू करून कुटुंबातील लोकांचे फोटो व अश्लील व्हिडिओ अपलोड करून नातेवाइक व समाजात बदनामी होण्याच्या इराद्याने ठेंगोडा येथील एका तरुणाचे तसेच त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे अश्लील व्हिडिओ या तरुणाच्या पत्नीनेच सोशल मीडियावर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठेंगोडा येथील 34 वर्षीय उच्च शिक्षित छोटु हरी सोनवणे यांचा विवाह ठाणे येथील तरुणीशी झाला होता. सहा महिने दोघांमध्ये संसार गुण्यागोविंदाने सुरू असतांनाच अचानक मला खेडेगावात करमत नाही आपण मुंबईला रहायला जाऊ असा प्रस्ताव पत्नीकडून पती छोटू याला देण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव अमान्य केल्यामुळे दोघा पती पत्नीमध्ये शाब्दिक खटके उडाले. अशातच पत्नी घर सोडून ठाणे येथे राहण्यास निघून गेली. वारंवार निरोप देऊनही पत्नी नांदण्यास येत नव्हती. उलट पत्नीने छोटु सोनवणे यांच्या विरूद्ध काशीमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मला नांदण्यास यायचे नाही. त्या मोबदल्यात वीस लाख रूपये देऊन घटस्फोट करून घ्या, अशी मागणी वारंवार होऊ लागली. छोटू सोनवणे यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी नकार देताच पत्नीने पती छोटु सोनवणे याच्या नावाने इंस्टाग्रामला बनावट अकाऊंट सुरू केले. त्यावर छोटू सोनवणे यांच्या कुटुंबातील लोकांचे निरनिराळे फोटो व अश्लील व्हिडिओ अपलोड केले. त्यातच छोटू सोनवणे याचे निधन झाला असल्याचा फोटोही टाकण्यात आला. यामुळे नातेवाइकांत व समाजात बदनामी झाल्यानंतर 20 लाख रुपये मिळतील या हेतूने हे कृत्य केले. नातेवाइक व समाजाकडून छोटु सोनवणे यास विचारणा झाली असता हे अकाऊंट माझे नाही असे सांगून सदर मोबाइल क्रमांकाची पडताळणी केली असता तो छोटू सोनवणे यांच्या पत्नीचा असल्याचे सिद्ध झाले. त्यावरून छोटू सोनवणे याने पत्नीविरूद्ध सटाणा पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.