अन्यथा कारवाई
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरीकांना कळविणेत येते की, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, यांचेकडील दिनांक 12 मे 2020 रोजीच्या सुधारीत नव्या मार्गदर्शक तत्वानुसार नदीचे प्रदुषण व नुकसान टाळण्याकरीता केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) च्या मुर्तीवर बंदी जाहीर केली आहे. तसेच, उच्च न्यायालय यांनी देखील ही बंदी कायम केली आहे. या पार्श्वभुमीवर प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) पासुन मुर्ती निर्मिती, आयात, साठा बंदीबाबत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सदरहु सुधारीत मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत सुचित करण्यात आले आहे.
तथापि, प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) मुर्ती निर्मिती, आयात, साठा करणारे व्यापारी इत्यादी व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी दिनांक 1 जानेवारी 2021 पर्यंत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने मुदतवाढ दिली होती. केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिनांक 12 मे 2020 रोजी प्रकाशीत केलेल्या सुधारीत मुर्ती विसर्जनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी दिनांक 1 जानेवारी 2021 पासुन बंधनकारक केली असल्याचे उक्त संदर्भाधिन पत्रान्वये मार्गदर्शक नविन मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या आहेत.
सबब, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील श्री गणेशोत्सवाकरीता अथवा अन्य विविध सण, उत्सव, कार्यक्रम इ.अनुषंगाने मुर्तीकारांकडून मुर्ती निर्मिती, आयात, साठा, विक्री इ. कार्यवाही केली जाते. त्याअनुषंगाने शहरातील सर्व मुर्ती विक्रेते, कारखाने, कारागीर, साठवणुक करणारे व्यापारी, दुकानदार, गाळेधारक इत्यादींना सुचित करणेत येते की, त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासुन मुर्ती निर्मिती, आयात, साठा बंदीबाबतच्या मार्गदर्शक सुचनांबाबत काटेकोरपणे पालन करावे. तसेच, नागरीकांनी प्लास्टर ऑफ पॅरिस पासुन (POP) तयार होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मुर्तीं नदीपात्रात वा नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतात विसर्जित करू नये. सदर मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरूध्द नियमानुसार कारवाई करणेत येईल. असे पालिकेने म्हटले आहे.