मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल
नाशिक : प्रतिनिधी
पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला रंगेहाथ पकडल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना जर ट्रॅपची माहिती अगोदरच होती, तर मग जावयाला सतर्क काल केले नाही? असा सवाल केला. गेल्या काही दिवसांपासून महाजन आणि खडसे वाद चांगलाच रंगला आहे. काल पुण्यातील घटनेनंतर तर या वादाला आणखी हवा मिळाली आहे.
नाशिक दौर्यावर काल गिरीश महाजन आले असता माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले, की जर खडसेंना ट्रॅपची कल्पना होती, तर त्यांनी आपल्या जावयाला आधीच सतर्क करायला हवे होते. तो काही लहान मूल नव्हता की त्याला कोणीतरी उचलून नेले आणि पार्टीमध्ये ठेवले. महाजन पुढे म्हणाले, जर कोणी चूक केली असेल, तर त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारवाई झाली की लगेच षडयंत्राचा आरोप करणे अयोग्य आहे. प्रत्येक वेळी सगळं षडयंंत्रच कसं असतं? यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. मी काल पंढरपूरमध्ये होतो आणि रात्री उशीरा घरी आल्यावर झोपलो होतो. नंतर काही फोन आले, मी उठून टीव्ही लावला तेव्हा हे प्रकरण समजले. महाजन यांनी पोलीस तपासावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, हा तपासाचा विषय आहे. पुणे पोलीस तपास करत आहेत. फोन तपासणी झाल्यावर अनेक गोष्टी समोर येतील. कोणत्या कारणाने पार्टी झाली, कोण बोलावलं, हे सगळं स्पष्ट होईल. खडसे यांनी नुकतेच अमली पदार्थांवर भाष्य करत, इतके ड्रग्ज चाळीसगावमध्ये कुठून येतात? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर महाजन म्हणाले, की खडसेंचे जावईच जर या प्रकारात गुंतलेले असतील, तर आता कोणाला
दोष द्यायचा?
दरम्यान, महाजन यांनी पुणे पोलिसांशी कोणताही संपर्क झालेला नसल्याचे स्पष्ट केले. रेव्ह पार्टीमध्ये हुक्का आणि मद्य सापडल्याचे देखील बोलले जात आहे. या प्रकरणामुळे महाजन-खडसे वाद अधिक तीव्र होत चालला असून, यातून राजकीय संघर्षाला नवे परिमाण लाभण्याची चिन्हे
आहेत.