इगतपुरी : प्रतिनिधी
पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी शहरातील लहान-मोठे नाले, गटारी स्वच्छता मोहीम राबवून नगर परिषदेने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाळ्याआधीच शहरातील मोठे नाले रस्त्यालगतच्या नाले गटारीतील घनकचरा काढून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी नागरीकांच्या तक्रारी येण्यापूर्वीच स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
येणार्या पावसाळ्यात गल्ली-वस्तीमध्ये व घरांत पाणी घुसणार नाही याची काळजी घेत सफाई कर्मचारी कामाला लावून पावसाळ्यात माशा व डासांचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामाला गती दिल्याने नागरिकांनी मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांचे व सफाई कर्मचार्यांचे आभार मानले. इगतपुरीत पावसाचे प्रमाण जास्त असून, गल्ली व मुख्य रस्त्यावर घनकचरा वाहून येतो. त्यामुळे काहींच्या घरांत पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होते. जेसीबी व अनेक उपकरणे वापरून शहरातील लोया रोड, बजरंगवाडा, मच्छी मार्केट, भाजीबाजार, शिवाजी चौक, गुप्ता व्यायामशाळा, खालची पेठ, तीन लकडी आदी भागातील तसेच शहरातील सर्वच प्रभागांतील नाले, गटारी आदी घनकचरा स्वच्छ करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले. शहरातील सर्व प्रभागांत कीटकनाशके फवारणी व ब्लीचिंग पावडरची फवारणी करणार असून, यावेळी शहरात पावसाळ्यात विविध कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्याचे काम करणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी सांगितले. यावेळी आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे व सफाई कर्मचारी
उपस्थित होते.
शहरात दरवर्षी पावसाळ्यात स्वच्छता मोहीम राबविताना सफाई कर्मचार्यांना अनेक अडथळे येतात. घरांत घुसलेले पाणी काढताना नागरिकांचा वेळ जात असल्याने सर्व प्रभागांतील समस्या सोडविणे कठीण होते. म्हणून नागरी सुविधांचा विचार करता पावसाळ्यापूर्वीच नाले व गटारीत साचलेली घाण उचलली गेली तर पावसाळी आजारांचे प्रमाण कमी होते. कीटकनाशक फवारणीचा चांगला उपयोग होऊन पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होते.
– सोमनाथ आढाव, मुख्याधिकारी