घोटी- सिन्नर चौफुलीवरील खड्डे त्वरित बुजवा

उपजिल्हाप्रमुख चौधरी; वाहनधारकांनी टोल का भरावा?

घोटी : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक- इगतपुरी ते कसारा घाटदरम्यान रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकजण जायबंदी होत आहेत. येथील टोलनाका प्रशासन फक्त टोलवसुलीवर लक्ष केंद्रित करत आहे. रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
टोल प्रशासन दुरुस्ती करीत नसेल, तर वाहनधारकांनी टोल का भरावा, असा प्रश्न येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कुलदीप चौधरी यांनी केला आहे.
सिन्नर चौफुलीवरील उड्डाणपूल सुरू आहे. मात्र, सर्व्हिस रोडची चाळण झाली आहे. वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी आहे. सिन्नर चौफुलीवरील रस्त्याची दरवर्षी दयनीय अवस्था होते. तीन-चार महिन्यांपूर्वीच येथे रस्त्याचे काम झाले होते. मात्र, केवळ दोनच महिन्यांत या रस्त्याची पूर्णत: वाट लागली.
खड्ड्यांमुळे वाहने चालवणेही अवघड होत आहे. महामार्गाची दुरवस्था झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. घोटी- सिन्नर चौफुलीवर गेल्या चार वर्षांपासून रखडलेला उड्डाणपूल झाल्यानंतर वाहनधारक सुटकेचा नि:श्वास घेतील, असे वाटत होते. मात्र उड्डाणपूल सुरू होऊन ही परिस्थिती जैसे थेच आहे. रोज मनस्ताप होत असून, काहींना जीव गमवावा लागत आहे. टोलनाका प्रशासनाने रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चौधरी यांनी केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *