प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गितेंचे आवाहन
नाशिक : प्रतिनिधी
शहर जिल्ह्यासह नाशिक विभागात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. शुक्रवारी (दि.4) लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. मात्र, नागरिकांनी जलप्रदूषण टाळण्याकरिता व पर्यावरण संवर्धनासाठी कृत्रिम जलकुंभाचाच वापर करून गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
गिते यांनी पत्रकाद्वारे म्हटले की, नागरिकांसाठी विसर्जनाकरिता तात्पुरत्या स्वरूपात कृत्रिम जलकुंभ तयार करावेत. तसेच निर्माल्य कलश स्वतंत्र ठेवावे. मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकक्षेतील जलसंधारण योजनांतील पाणी हे प्रामख्याने गावे व शहरांसाठी तसेच धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्यासाठी, शेती सिंचनाकरिता वापरले जाते. गणेशोत्सवात बाप्पाला निरोप देतेवेळी जलशयात, साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, को. प. बंधारे यामध्ये निर्माल्य टाकण्याबरोबरच गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. परंतु, यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. शिवाय, विसर्जनावेळी धरण, तलावात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने जीवितहानीच्या घटना घडण्याची भीती असते.
यामुळे नागरिकांच्या सुरक्षेस बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरील वस्तुस्थिती विचारात घेता जलाशयांतील जलप्रदूषण टाळण्यासाठी व पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन कालावधीत आपल्या विभागांच्या कार्यकक्षेतील जलशयात व धरणांमध्ये गणेशमूर्ती व निर्माल्य टाकण्यास प्रतिबंध करण्यात यावे. जेणेकरून धरण परिसर प्रदूषणमुक्त व नागरिकांची सुरक्षा घेतली जाऊ शकते. धरण परिसरातील शहरे व गावातील नागरिकांना त्यांच्या स्तरावर स्थानिक पातळीवर व ग्रामपंचायत स्तरावर आवाहन करण्यात यावे. तसेच याबाबत क्षेत्रीय अधिकार्यांना त्यांच्या स्तरावर आवश्यक सूचना देण्यात याव्यात, असे मृद व जलसंधारणचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना दिलेल्या पत्रातून म्हटले आहे.