असोसिएशन ऑफ साउथईस्ट नेशन्स म्हणजे आसियान या संघटनेची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी अमेरिका-रशिया शीतयुद्धाच्या कालखंडात झाली. दक्षिणपूर्व आशियात राजकीय व सामाजिक स्थैर्याला चालना देण्यासाठी इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स आणि थायलंड या पाच देशांनी ही संघटना थायलंडची राजधानी बँकॉक येथे स्थापन केली. आर्थिक आणि व्यापारी दुवा साधण्यासाठी 1992 मध्ये भारत या संघटनेचा एक भागीदार (सदस्य) झाला. सन 1996 मध्ये या संघटनेच्या संवाद प्रक्रियेतील एक भागीदार म्हणून भारताला बढती मिळाली. यामुळे भारताला संघटनेच्या चर्चेत औपचारिकपणे सहभागी होण्याची संधी मिळाली. सन 2002 मध्ये भारताला शिखर परिषद पातळीवरील एक भागीदार म्हणून संधी मिळाली. हळूहळू भारत या संघटनेचा एक महत्त्वपूर्ण सदस्य बनला. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे 26 ते 28 ऑक्टोबरदरम्यान आसियानची 47 वी शिखर परिषद पार पडली. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी आभासी पद्धतीने परिषदेला संबोधित केले. आगामी शतक हे भारत-आसियान ऐक्याचे शतक आहे आणि भारत-आसियान यांचे ऐक्य म्हणजे भविष्यकाळात वैश्विक सामर्थ्याचा भक्कम आधार बनणार आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्या ही आसियानमध्ये राहते. आसियान देशांनी परस्परांशी व्यापार-उदीम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण भक्कमपणे केल्यास जगाच्या आर्थिक समृद्धीमध्ये आसियान देश महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असेही मत मोदींनी भाषणात मांडले. मुक्त आणि स्वतंत्र हिंद प्रशांत क्षेत्र हे जागतिक सत्ता समतोलासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. विशेषत: वर्तमान जगातील दोलायमान आणि अस्थिर अशा आर्थिक परिस्थितीत जगाला शांतता व स्थैर्य प्रदान करण्याचे कार्य आसियान राष्ट्र करू शकतात, असे विचार त्यांनी मांडले. आसियान राष्ट्रांमध्ये अकरा देशांचा समावेश आहे. आसियान परिषदेच्या निमित्ताने क्वालालंपूर येथे झालेल्या विचारमंथनात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हजेरी लावल्यामुळे या परिषदेतील चर्चा व विचारमंथनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. भू-राजनैतिक दृष्टीने विचार करता दक्षिण आशियातील आणि विशेष करून आग्नेय आशियातील शांतता व स्थैर्याच्या दृष्टीने आसियान राष्ट्रांचा परस्परसमन्वय आणि सुसंवादित्व अनेक दृष्टीने महत्त्वाचे ठरले. भारताने आसियान राष्ट्रांना त्यांच्या विकासकार्यात आणि तेथील आपत्तीच्या प्रसंगी मदत केली आहे आणि पुढेही भारत एक थोरला भाऊ या नात्याने या राष्ट्रांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. या पार्श्वभूमीवर 21 वे शतक हे भारत आणि आसियान यांच्या प्रभुत्वाचे शतक असणार आहे, याची ग्वाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिली. प्राचीन काळापासून भारत आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांमध्ये भक्कम सांस्कृतिक संबंधांचा सुवर्णबंध आहे. भारत-आसियान राष्ट्रांत संस्कृती, पर्यटन तसेच विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण इत्यादी क्षेत्रांत सहकार्य वाढीस लागत आहे. आसियान राष्ट्रांना केंद्रबिंदू मानून भारत मजबूत भागीदारी विकसित करत आहे. सर्वसमावेशक शाश्वतता हे यावर्षीच्या आसियान परिषदेचे उद्दिष्ट होते. त्यानुसार पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि साधनसामग्रीच्या न्याय्य, उचित वापरासाठी सदैव सहकार्याचा हात भारत पुढे करत आहे. सर्व संकटांच्या प्रसंगी भारत आसियान राष्ट्रांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. सागर सुरक्षा आणि नील व्यापार क्षेत्रांत या राष्ट्रांचे सहकार्य मोठे आहे. सन 2026 हे वर्ष सागरी सहकार्याचे नवे वर्ष म्हणून पुढे येत आहे. आरोग्य, हरित ऊर्जा आणि पर्यावरण रक्षण, शिक्षण, संशोधन अशा अनेक क्षेत्रांत भारत-आसियान पुढे वाटचाल करत आहेत. आसियान विकास दृष्टी-2045 आणि विकसित भारत-2047 ही स्वप्ने आसियान व भारताची आहेत. प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत लोकसंपर्क हा भारत-आसियान संबंधांचा आत्मा आहे. भविष्यकाळात संपूर्ण मानव समुदायासाठी संपन्न उज्ज्वल कालखंडाची निर्मिती करणे, हे उभयतांचे समान स्वप्न आहे. प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी भारत व आसियान देश दमदार वाटचाल करत आहेत. भारत-मलेशिया सहकार्याप्रमाणेच क्वालालंपूर येथे आसियानने प्रकाशित केलेल्या संयुक्त निवेदनात 15 कलमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पर्यटन, सांस्कृतिक आदानप्रदान, शाश्वत पर्यावरण, आर्थिक गुंतवणुकीस चालना, व्यापार-उदीम यावर भर देण्यात आला आहे. पर्यटनाप्रमाणेच डिजिटल तंत्रज्ञानाचे आदानप्रदान, तसेच सामाजिक, सांस्कृतिक शाश्वतता, पर्यावरण संतुलन, प्रदूषण नियंत्रण, आर्थिक विकासातील आदानप्रदान आणि शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्याचे प्रयत्न यांवर भर देण्यात आला आहे. सर्वांना सर्व क्षेत्रांत सहकार्य करावे, यावरच शिखर परिषदेत भर देण्यात आला आहे. आग्नेय आशियाई देशातील भारतीय शिल्पकला, स्थापत्य तसेच बौद्ध परंपरांचा विलक्षण प्रभाव पाहता आसियान देशांशी असलेले भारताचे सांस्कृतिक संबंध आता नव्याने दृढ होत आहेत. कला, स्थापत्य आणि भारतीय शिल्पकलेचा असा ठेवा या देशाने जपला आहे. त्यामुळे भारत-आसियान देशांत पर्यटन प्रक्रियेला मोठी गती प्राप्त झाली आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आग्नेय आशियाई देशांतील सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी भारताने विशेष पुढाकार घेतला, तेव्हापासून भारतीय पर्यटकांची संख्या या देशांना भेट देण्यासाठी सातत्याने वाढत आहे.