भावाच्या अंगणात…

देते बहीण निरोप माहेरच्या वाटसरा
ये रे उडत उडत माझ्या धाकट्या पाखरा
माय-बापाच्या माघारी
आपण एकटे रे भाऊ…पडतो
बहिणीच्या शब्दातून भावाला धीर सापडतो
फार लांबवर होती माय-बापाची सावली
पायाखालची जमीन आता बघा कशी रे कावली
होतं मायेचं भंडार आपल्या माउलीच्या उदरात
आता तेच शोधा रे…बहिणीच्या पदरात
एकच मागणं असतं रे भाऊ प्रत्येक बहिणीचं
जगावेगळं असतं हे बहीण-भावाचं नातं
एक रात्र विसावा मागतात तुझ्या अंगणात
दारी वृंदावनपाशी का असेना चमेलीच्या मांडवात
संसाराच्या रगाड्यात होतो भेटाया उशीर
बहिणीचं हरिण काळीज मन बोलाया अधीर
किती बोलू, किती नको, काय सांगू तुला भाऊ
गुजगोष्टी बोलू खंडीभर तुझ्या मुक्कामाला राहू
भाऊ सदा गुंतलेला तुला ढीगभर काम
नाही भेटत सगळे जो तो असतो लांब
कवडशाच्या डोळ्यांनी डोकावया भाऊ भेट
वाट पाहता पाहता सूर्यमाथ्यावर थेट
बहीण-भावाची प्रीती जशा समुद्राच्या लाटा
रक्षाबंधनानिमित्त आनंद हा आता वाटा…
पुष्कन्या- तत्त्वेेश्वरी
– डॉ. वर्षा देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *