नाशिक पेन किलर, न्यूरो प्लस, रोबोडॉक्स संघांची आघाडी
नाशिक ः प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असलेले कन्सल्टंट आणि सुपरकन्सल्टंट डॉक्टरांची कन्सल्टंट प्रिमियर लिग (सीपीएल) २०२३ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे शुक्रवारी (दि.३) दिमाखात उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी या संघांनी आपआपले सामने जिंकले.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे, सीपीएल २०१३ चे समिती प्रमुख डॉ. अनिरुद्ध भांडारकर, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. नितीन चिताळकर, सचिव डॉ. मिलिंद गांगुर्डे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सामन्यात नाशिक पेन केअर संघाने संकल्प सुपरनोवा संघाचा पराभव केला. विजयासाठी लागणार्या ६२ धावा नाशिक पेन केअर संघाने अवघ्या ५.४ षटकांमध्ये पूर्ण करत सामना जिंकला. सामनावीर आणि सर्वाधिक षटकारचा किताब डॉ.गणेश सांगळे, बेस्ट कॅचसाठी डॉ.विशाल करवंदे यांना गौरविले. दुसर्या सामन्यात न्युरोप्लस वीर मराठा संघाने ७ बाद ८७ धावा करतांना प्रतिस्पर्धी सह्याद्री शेराज् संघाला ७२ धावांवर गुंढाळत सामना जिंकला. डॉ.कुणाल देसाई सामनावीर, डॉ.रविंद्र गायकवाड बेस्ट कॅच, तर मॅक्स सिक्सचा किताब संतोष बोरसे यांना दिला.
तिसर्या सामन्यात ओम वॉरीयरने दिलेले ७४ धावांचे लक्ष्य ९.४ षटकांत गाठतांना ऑरथो रोबोडॉक्स संघाने सामना जिंकला. डॉ.सचिन आहेर सामनावीर ठरले, बेस्ट कॅच डॉ.प्रदीप राउत आणि मॅक्स सिक्सचा किताब डॉ.सचिन आहेर यांना दिला. चौथ्या सामन्यात न्युरोप्लस वीर मराठा संघाने दिलेले ९४ धावांचे लक्ष संकल्प सुपरनोव्हा संघाला गाठता आले नाही. त्यामूळे हा सामना न्युरोप्लस वीर मराठा संघाने जिंकला. डॉ.कुणाल देसाई सामनावीर, मॅक्स सिक्सचा किताब डॉ.सुहास कोटक, बेस्ट कॅचचा किताब डॉ.देवेंद्र कुलकर्णी यांनी पटकावला.
पाचवा सामन्यात ओम वॉरीयर संघाने ९८ धावा केल्या. प्रतिस्पर्धी सह्याद्री शेराज् संघाला ७ बाद ८४ धावा करता आल्याने ओम वॉरीयरने सामना जिंकला. सामनावीर डॉ. प्रदीप राउत, मॅक्स सिक्स डॉ.सुदर्शन पाटील, तर बेस्ट कॅच डॉ.प्रशांत मुठाळ यांना देण्यात आला. सहावा सामना अत्यंत उत्कंठावर्धक राहिला.
शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या सामन्यात ऑरथो रोबोडॉक्सच्या डॉ.सुशील अंतुर्लीकर यांनी शेवटच्या दोन चेंडूत १३ धावा करतांना सामन्यात विजय मिळविला. संघाला नाशिक पेन केअर संघाने १०३ धावांचे लक्ष दिले होते. शेवटच्या षटकात नो बॉलने रोबोडॉक्स संघाला तारले. या सामन्यात सामनावीर व मॅक्स सिक्सचा किताब डॉ.अंतुर्लीकर यांना तर बेस्ट कॅचचा किताब प्रणित सोनवणे यांना दिला.