मुलं-मुली एकच, भेद नाही; आशा सेविकांकडून जनजागृती
नाशिक : प्रतिनिधी
बेटी बचाओ, बेटी पढाओची अंमलबजावणी आणि नागरिकांमधील मुलींबाबतचा बदलत जाणारा दृष्टिकोन यामुळे समाजात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शहरात मागील तीन महिन्यांत मुलींचा जन्मदर 892 पर्यंत गेला आहे. मुलं आणि मुलीमध्ये कुठलाही भेद नाही. लिंगभेद करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत मनपाच्या आशा सेविकांकडून शहरात जनजागृती केली जात आहे.
महापालिकेत गुरुवारी (दि. 21) माता मृत्यू समितीच्या बैठकीत या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुलींच्या जन्मदाराची आकडेवारी तपासण्यात आली.
बैठकीत माता मृत्यूची एकूण सहा प्रकरणे समोर ठेवण्यात आली. मात्र, सदर प्रकरने ग्रामीण भागातील असल्याचे सांगण्यात आले. शहरात गर्भलिंग निदानला चाप बसावा, याकरिता शहरातील तीनशे सोनोग्राफी केंद्राची व 602 रुग्णालयाची तपासणी मनपाच्या आरोग्य विभागाने केली. महापालिकेच्या या उपक्रमामुळे मुलींच्या जन्मदरात सुधारणा दिसून येत असून, पुढील काळात या मोहिमेला आणखी गती देण्याचा निर्धार आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली होती. त्याचा सकारात्मक परिणाम तीन महिन्यांत दिसून आला आहे. मागील वर्षी हजार मुलांमागे केवळ 889 मुलींचा जन्मदर नोंदवला गेला होता. मात्र, मागील तीन महिन्यांत मुलींचा जन्मदर वाढून सरासरी 892 वर पोहोचला आहे. दोन लाख घरांमध्ये सातशे आशा कर्मचार्यांकडून पालकांचे समुपदेशन केले. त्यातून मुलगा-मुलगी समानतेचा संदेश पोहोचल्याने मागील तीन महिन्यांत मुलींचा जन्मदर वाढल्याचा दावा
मनपाने केला.
मुल-मुली एकच असून, लिंग निदान कायद्याने गुन्हा आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती केली जात आहे. गत तीन महिन्यांत शहरातील मुलींचा जन्मदर 892 वर गेला आहे.
-डॉ. जितेंद्र धनेश्वर, सहायक आरोग्याधिकारी, मनपा