समीर पठाण लासलगाव
मागील अनेक दिवसांपासून राज्यात एसटी बसेसला होणाऱ्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसत आहे.वाहनचालकांचा निष्काळजीपण आणि अती वेगाने बस चालवल्याने हे अपघात होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.
बसेसच्या या वाढत्या अपघातास खराब झालेल्या बसेस कारणीभूत ठरत आहेत.प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेली एसटी आता प्रवाशांना नकोशी झाल्याने एसटी महामंडळाला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.शिवाय देखभाल आणि दुरुस्ती नसल्याने बस अपघातांच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाका जवळील मिरची हॉटेल चौकात अपघात घडला होता. ट्रकने खाजगी बसला धडक दिली होती.अपघात झाल्यानंतर काही क्षणातच खाजगी बसने पेट घेतल्याने या 13 लोकांचा मृत्यू झाला होता.याच अपघाताची पुनरावृत्ती म्हणजे गुरुवारी नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाका परिसरात दोन तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातानंतर बसने पेट घेतला.या भयंकर अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे अपघात झाल्यानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली.या घटनेमुळे पुन्हा एकदा मिरची हॉटेल जवळ झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे
राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या अपघाताच्या बऱ्याच गंभीर घटना राज्यात झाल्या असून यामुळे प्रवाशांची विश्वासार्हता कमी होताना दिसत आहे.त्यामुळे महामंडाळाने वेळीच याची दखल घेत कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.एकंदरीत वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटना पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसबाबत लोकांचा रोष वाढत आहे.त्यामुळे वेळीच काही ठोस पावले उचलली नाही तर ही सुविधा असुविधेत बदलायला वेळ लागणार नाही.