रात्रीच्या अघोषित भारनियमनामुळे नागरिक तिहेरी संकटात
मुकणे : प्रतिनिधी
पावसाने सोमवारपासून उघडीप दिली अन् दुसरीकडे लगेच महावितरण कंपनीने अघोषित भारनियमन सुरू केले, तेही सायंकाळी सातला गायब झालेली वीज तीन तासांनी म्हणजे रात्री दहाला आली. यामुळे आधीच एकीकडे वाढत्या चोर्या, बिबट्याच्या येरझार्या अन् अघोषित भारनियमनामुळे नागरिक तिहेरी संकटात सापडले आहेत.
मुकणेसह परिसरात फिरणारे बिबटे आता भक्ष्याच्या शोधात थेट गावापर्यंत येऊ लागल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली असताना सोमवारपासून पावसाने काहीशी उसंत दिली. मात्र, महावितरण कंपनीने सायंकाळी सातला अघोषित भारनियमन सुरू केले आहे. याबाबत वीज वितरण विभागाच्या वाडीवर्हे उपकेंद्रांतर्गत येणार्या पाडळी-मुकणे शिवहद्दीवरील सबस्टेशनला विचारणा केली. वरिष्ठांच्या आदेशामुळे भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगितले. तेही संध्याकाळचेच भारनियमन असल्याचे सांगितल्याने सातला बंद केलेली वीज तब्बल तीन तासांनी म्हणजेच दहा वाजता आली.
यावर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होणे किंवा जखमी होण्याचे प्रकार नागरिकांसाठी नवीन नाही. बिबट्याच्या धास्तीने शेतवस्तीवर राहणारे शेतकरी जीव मुठीत धरून वावरत आहेत. त्यातच आता वीज कंपनीच्या अघोषित व सायंकाळचे भारनियमन सुरू केल्याने यावर उपाय तरी काय शोधावा, अशी भावना शेतकर्यांनी बोलून दाखवली आहे. बिबट्याची दहशत त्यावर वाढत्या चोर्यांचे चिंताजनक प्रकार व आता वीज कंपनीचा रात्रीचा अजब व अघोषित भारनियमनाचा भार यामुळे शेतकरी, ग्रामस्थांना दाद मागायची कुणाकडे? तसेच याकडे कुणी लक्ष देईल का? अशी आर्त विनवणी करण्याची वेळ आली आहे.
वाढत्या चोर्या, बिबट्याची दहशत व त्यातच रात्रीचे सुरू झालेले भारनियमन यामुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत. तसेच वीज कंपनीने भारनियमनाची आवश्यकता असेल तरच ते दिवसा करावे व रात्रीचे भारनियमन करू नये.
-पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती, इगतपुरी